पहिल्या पावसाच्या सरींनी मुंबईकर झाले गारेगार

गुरुवारी सायंकाळी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये वर्दी देत पावसाने सर्वांना खूश करून टाकले
पहिल्या पावसाच्या सरींनी मुंबईकर झाले गारेगार

मुंबईसह ठाणे परिसरात गुरुवारी सकाळपासूनच प्रचंड उष्मा जाणवत होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होता. असह्य उकाड्याने मुंबईकर, ठाणेकर अक्षरश: हैराण झाले होते. हीच चाहूल होती पावसाची. अखेर गुरुवारी सायंकाळी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये वर्दी देत पावसाने सर्वांना खूश करून टाकले.

उन्हाळा संपल्यावर पाऊस कधी सुरू होणार याचीच वाट सर्वजण पाहत असतात. यंदाचा उन्हाळा भीषण होता. हवामान खात्याने यंदा लवकर पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला; पण पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. गुरुवारी सायंकाळी वांद्रे, खार, सांताक्रूझ येथे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. वातावरणात गारवा पसरला. येत्या ११ जूनपासून मुंबईत मान्सूनला सुरुवात होणार आहे. गुरुवारी सांताक्रूझला किमान २९.५ अंश तर कमाल ३४.९ अंश तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथे किमान २६.४ अंश व कमाल ३४.६ अंश तापमान नोंदवले गेले.

logo
marathi.freepressjournal.in