देशात ‘टोमॅटो फ्लू’ या नवीन आजाराची साथ; मुंबईत एकही रुग्ण नाही,केरळमध्ये आतापर्यंत ८२ मुलांना लागण

त्वचा लाल पडत असल्याने त्याचे नाव ‘टोमॅटो फ्लू’ पडले आहे.
 देशात ‘टोमॅटो फ्लू’ या नवीन आजाराची साथ; मुंबईत एकही रुग्ण नाही,केरळमध्ये आतापर्यंत ८२ मुलांना लागण

कोरोना, मंकी पॉक्सनंतर आता देशात ‘टोमॅटो फ्लू’ या नवीन आजाराची साथ आली आहे. केरळमध्ये आतापर्यंत ८२ मुलांना याची लागण झाली आहे. वैद्यकीय जर्नल ‘लॅन्सेट’मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे; मात्र मुंबईत अद्याप या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

‘लॅन्सेट’च्या माहितीनुसार, या आजारात त्वचेवर लाल डाग पडतात. मोठमोठे फोड येतात. याची लक्षणे चिकुनगुनिया, कोरोना, मंकीपॉक्ससारखी आहेत. त्वचा लाल पडत असल्याने त्याचे नाव ‘टोमॅटो फ्लू’ पडले आहे. या आजारात ताप येतो, शरीरात कणकण जाणवते; मात्र या आजाराचा विषाणू ‘सार्स-सीओव्ही-२’शी संबंधित नाही.

‘लॅन्सेट’च्या म्हणण्यानुसार, ६ मे ते २६ जुलै २०२२ या कालावधीत केरळच्या कोल्लम जिल्ह्यात पहिल्यांदा या आजाराचा रुग्ण आढळला. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या ८२ मुलांमध्ये हा आजार आढळला. ओडिशात १ ते ९ वर्षे वयाच्या २६ मुलांना या आजाराची लागण झाली, अशी माहिती भुवनेश्वरच्या विभागीय वैद्यकीय संशोधन केंद्राने दिली. केरळ, तामिळनाडू व ओडिशा वगळता अजून एकाही राज्यात या आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून आलेले नाही.

ही आहेत लक्षणे

अंगावर पुरळ, हाताच्या रंगात बदल, त्वचेची जळजळ, उच्च ताप, थकवा येणे, उलटी, अतिसार, अंगातील पाणी कमी होणे, शरीर दुखणे, सांधे सुजणे, खोकला, शिंका येणे, नाक वाहणे, ओटीपोटात वेदना, तोंड कोरडे होणे, गुडघे दुखणे.

नायर रुग्णालयाच्या वरिष्ठ बालरोगतज्ज्ञांनी सांगितले की, मुंबईत अद्याप एकही ‘टोमॅटो फ्लू’ आजाराचा रुग्ण सापडलेला नाही. आमच्याकडे हात, पाय व तोंडाला संसर्ग झाल्याचे रुग्ण येत आहेत.

घाटकोपरच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. बकूल पारेख यांनी सांगितले की, साधारण हात, पाय व मुख संसर्ग व ‘टोमॅटो फ्लू’त होणाऱ्या संसर्गात फरक आहे. ‘टोमॅटो फ्लू’त रुग्णाच्या शरीरावर लालसर रंगाचे मोठमोठे फोड येतात. हा आजार विषाणूने होणार असून तो संसर्गजन्य आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in