वेळ अजूनही गेलेली नसून शिवसेनेचे दरवाजे खुले -सचिन अहिर

महिना झाला तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे.
वेळ अजूनही गेलेली नसून शिवसेनेचे दरवाजे खुले -सचिन अहिर

बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आमदार शहाजीबापू पाटील आणि उदय सामंत यांनी शिवसेना आणि शिंदे गट एकत्र येण्याचे भाष्य केले आहे; मात्र आधीच ही भूमिका घेतली असती तर ही वेळ आली नसती. वेळ अजूनही गेलेली नसून शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत,” असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी केल्यामुळे बंडखोर आमदार घरवापसी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिना झाला तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे. अशातच दीपक केसरकर, शहाजीबापू पाटील आणि उदय सामंत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाने एकत्र येण्याचे भाष्य केले आहे. त्यावर अहिर म्हणाले की, “शहाजीबापू पाटील, उदय सामंत यांची शिंदे-ठाकरे एकत्र येण्याची इच्छा आहे. त्यांना हे फार उशिरा सुचलेले शहाणपण आहे. ही भूमिका आधी घेतली असती तर ही वेळ आली नसती. पक्षप्रमुखांचे नेतृत्व त्यांना मान्य असेल तर आमचे नेहमीच दरवाजे उघडे आहेत. दीपक केसरकर यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. शिंदे गटातील विसंगती आता हळूहळू समोर येईल. नितेश राणे, निलेश राणे यांनी केसरकर यांना चांगलेच सुनावले आहे. आता युतीमध्ये काय सुरू आहे, ते लवकरच समोर येईल.

संपूर्ण राज्यात पूरस्थिती आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कुठलाही प्रशासकीय धाक राहिलेला नाही. अनेक जीआर काढले आहेत; पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. दिल्लीवाऱ्या होत असतानाही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही; मात्र कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, यातच वेळ निघून जात आहे. सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम यांनी केले आहे,” अशी टीकाही सचिन अहिर यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in