डॉ. सुधाकर शिंदे यांची मूळ विभागात पाठवणी; आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम

२ जून २०२३ मध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावर होणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
डॉ. सुधाकर शिंदे यांची मूळ विभागात पाठवणी; आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम
x
Published on

मुंबई : २ जून २०२३ मध्ये प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावर होणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिंदे यांच्या बदली करण्यात आली असून, त्यांना मूळ पदी रवाना होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बुधवार, ३१ जुलैला त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे सोपवली. दरम्यान, नियमबाह्य पदावर बसलेल्या सुधाकर शिंदे यांनी आठ महिन्यांत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीचा मुद्दा विधान परिषदेत अनिल परब यांनी लावून धरला होता. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचा कार्यकाळ संपला असताना कोणाच्या आशिर्वादाने शिंदे पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, असा सवाल परब यांनी विधान परिषदेत केला होता. अखेर सुधाकर शिंदे यांच्या बदलीचे आदेश जारी झाले असून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या पुढील प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रभावाने मुक्त करण्याचा निर्णय घेत त्यांच्या मूळ विभागात पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे बुधवारी अतिरिक्त आयुक्तपदाचा भार आयुक्तांकडे सोपवून ते आपल्या मूळ विभागात परतले. डॉ. सुधाकर शिंदे हे अंतर्गत महसूल सेवेतील अधिकारी असून ते २४ नोव्हेंबर २०१५ पासून राज्य सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. त्यांचा ८ महिन्यांचा मंजूर प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ हा २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संपला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, मनुष्यबळ विकास संचालनालय, वित्त मंत्रालय/महसूल विभागाने कळविले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२३ नंतर वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी नाकारली आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडून तत्काळ प्रभावाने मुक्त करण्यात आले आहे.

गेल्या आठ महिन्यांत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा - वडेट्टीवार

नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे. मात्र,या काळात नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यांत घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? हे सरकारने स्पष्ट करावे, असे सांगत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

logo
marathi.freepressjournal.in