Mumbai Coastal Road Inauguration: मुंबईकरांना ट्रॅफिक पासून दिलासा देण्यासाठी आणि प्रवास अजून सुखकर होण्यासाठी कोस्टल रोड अर्थात किनारा रस्त्याला वरळी - वांद्रे सागरी सेतूशी जोडणाऱ्या पूलाचे उद्धघाटन आज (१२ सप्टेंबर) दुपारी २ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस देखील उपस्थित होते. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर अवघ्या बारा मिनिटांत कापता येईल.
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोड हा वांद्रे - वरळी सागरी सेतूला जोडण्यात आला आहे. त्यामुळे मरीन ड्राइव्हवरून वांद्रे या मार्गाचा प्रवास हा तासाभराहून थेट १२ मिनिटांवर आला आहे. शिवाय दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
कोणत्या वेळेत करता येणार प्रवास?
दक्षिण मुंबईहून वांद्रेकडे जाणारी वाहने सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत थेट सी लिंकवर जाऊ शकतात. दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना मात्र नियमित मार्गाचा वापर सुरू ठेवावा लागेल.
"कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वर्सोवापर्यंत नेण्याची योजना" - मुख्यमंत्री
कोस्टल रोड विकसित करण्यासाठी परदेशातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. "कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वर्सोवापर्यंत नेण्याची आमची योजना आहे," असे यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
वेळ व इंधनाची बचत
कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरने जोडला गेल्याने वांद्रेहून दक्षिण मुंबईत प्रवास करता येणार आहे. यामुळे येथील रोजची होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, करमुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पामुळे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. शिवाय दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
१४ हजार कोटींपेक्षा जास्त बजेट असलेला कोस्टल रोड प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू होत असून आता चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे. कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग ११ मार्च रोजी वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत खुला झाला होता. तर, मरीन ड्राइव्हपासून हाजी अलीपर्यंतचा उत्तरेकडील मार्ग १० जून रोजी खुला झाला. त्यानंतर, ११ जुलै रोजी हाजी अली ते वरळीपर्यंतचा मार्ग कार्यान्वित झाला.