झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घ्या, साडेचार हजार खासगी व शासकीय मालमत्तांना उद्यान विभागाची नोटीस

झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घ्या, साडेचार हजार खासगी व शासकीय मालमत्तांना उद्यान विभागाची नोटीस

जोरदार वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता

मुंबई : पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात धोकादायक झाडे व फांद्या कोसळण्याचा धोका अधिक असतो. वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष करणाऱ्या मुंबईतील साडेचार हजार खासगी व शासकीय मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घ्या, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता पालिकेच्या उद्यान विभागाद्वारे मुंबईतील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. जोरदार वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्री व वाहनांसह उपलब्ध करून घेण्यात आले आहे. तसेच मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबणे टाळावे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना झाड अथवा फांद्या तुटण्याची दाट शक्यता असते. तसेच वीज कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसापासून बचाव करताना मुंबईकरांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.

१९ दिवसांत १४७ झाडे कोसळली

पावसाची वाट बघता-बघता जून महिना कोरडा गेला. जून महिना संपत आला आणि पाऊस बरसला. परंतु जून महिन्याच्या १९ दिवसांत म्हणजे १ ते १९ जून या कालावधीत तब्बल १४७ झाडे कोसळली, तर २५३ फांद्या तुटल्या. १४७ झाडे कोसळली त्यात खासगी मालमत्तेतील १०८, तर शासकीय हद्दीतील ३९ झाडे कोसळली.

तात्काळ संपर्क करा

सोसायटीच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती अतिधोकादायक असलेल्या झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयात तात्काळ कळवावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in