तुळशी तलाव ‘ओव्हर फ्लो; सात धरणांत ४१ टक्के पाणीसाठा

सातही धरणांत २० जुलै रोजी ४०.९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे डिसेंबर मध्यापर्यंत मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
तुळशी तलाव ‘ओव्हर फ्लो; सात धरणांत ४१ टक्के पाणीसाठा
Photo Credit: Shefali Parab Pandit
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव शनिवारी सकाळी ८ वाजता ओव्हर फ्लो झाला. सातही धरणांत २० जुलै रोजी ४०.९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे डिसेंबर मध्यापर्यंत मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, तुळशी व पवई या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. यंदा जूनमध्ये पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची हळुवार बॅटिंग सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. याआधी पवई तलाव ८ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. पवई तलावाचे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरण्यात येते.

धरण क्षेत्रात पावसाची अशीच दमदार बॅटिंग सुरू राहिली तर लवकरच मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपात रद्द होईल, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

असा आहे तुळशी तलाव

  • १८७९ मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधला

  • सर्वात लहान तलाव

  • तुळशी तलावातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लिटर (१.८ कोटी लिटर) पाणीपुरवठा

२० जुलै रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा - २१,६७१

  • मोडक सागर - १,७४,९९९

  • तानसा - १,११,१०८

  • मध्य वैतरणा - ७२,२०६

  • भातसा - २,८५,५८५

  • तुळशी - १७,४२७

  • विहार - ७,७१५

logo
marathi.freepressjournal.in