
मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले. मात्र दोन वर्षे उलटली तरी एक विटही रचलेली नाही. खासदार उदयनराजे भोसले यांनी राजभवनात महाराजांचे स्मारक उभारा, अशी मागणी केली आहे. ज्या खुर्चीचा अवमान राज्यपाल करत असतील तर त्याचा उपयोग काय, राज्यपालांपेक्षा शिवरायांचे स्थान मोठे असून राज्यपालांना दुसरीकडे शिफ्ट करा आणि राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक उभारा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उदयनराजे भोसले यांच्या मागणीला पाठिंबा देत भाजपला घेरले.
नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. वक्फ बोर्ड, ईव्हीएम मशीन घोटाळा अशा विविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपचे हिंदुत्व बुरसटलेले असून त्यांनी हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.
आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत, ते आपल्या पक्षातून बाहेर पडले. त्यांची एकूण वाटचाल पाहिली तर खूप खोलात जावे लागेल. दोन दिवसांपूर्वीच मोदी म्हणाले की, काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा. मोदींच्या या आवाहनानंतर काँग्रेसने दिलेल्या प्रतिक्रियांमधून मला एक-दोन गोष्टी आवडल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संघाने एका दलित समाजाच्या नेत्याला सरसंघचालक करून दाखवावे. मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की, येत्या वर्षात संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत, तर काँग्रेसला सव्वाशे वर्षे होत आहेत. त्यामुळे आतापर्यंत संघाच्या सरसंघचालकांची आणि काँग्रेसच्या प्रमुखांची यादी काढा. कोण दलित होते आणि कोण मुसलमान होते ही गोष्ट समोर आणा आणि लोकांसमोर ठेवा, अशी मागणी करत लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली.