गणेशोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दोन महत्वाचे राजकीय बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले आहेत. मंगळवारी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या दादरमधील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.
दोन महिन्यात तिसरी भेट
मागील काही वर्षांच्या राजकीय मतभेदांनंतर अलीकडेच ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्याचे चित्र आहे. दोन महिन्यांत झालेली ही तिसरी भेट महत्त्वपूर्ण ठरत आहे. यापूर्वी वरळीतील ‘हिंदी सक्ती’ विरोधी सभेत दोघे एकत्र दिसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या “हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है” या वक्तव्याने संभाव्य राजकीय समीकरणांबाबत संकेत दिले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या वाढदिवशी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांचे वैयक्तिक शुभेच्छा दिल्या होत्या.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने ठाकरे बंधूंची नवी जवळीक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत ठाकरे गट-मनसे युतीला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या.
गणपती दर्शनाच्या निमित्ताने झालेली ही भेट केवळ धार्मिक सोहळा ठरेल की आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण घडवेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.