उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे यावेळी उद्धव आणि राज या दोघांचे प्रत्येकी दोन अत्यंत विश्वासू शिलेदारही उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट झाली आहे. बुधवारी (दि. १०) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी अचानक भेट घेतली. जवळपास अडीच तासाच्या भेटीमुळे आगामी महापालिका निवडणुका आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांबाबत नवी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चर्चेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रमुख नेते खासदार संजय राऊत आणि अनिल परब होते, तर मनसेकडून संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर सहभागी झाले. त्यामुळे ही भेट कौटुंबिक असण्यापेक्षा पूर्णपणे राजकीय स्वरूपाची ठरली. तसेच, याआधी ठाकरे बंधू मराठीचा विजयी मेळावा, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि राज ठाकरेंच्या घरी गणेशोत्सव निमित्ताने भेटले. पण, आज कोणताही कार्यक्रम नसताना ठाकरे बंधूंची भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे.

महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर?

मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. भाजप-शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी मनसे-शिवसेना युती होण्याची शक्यता आहे. गेले अनेक दिवस ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. विशेषतः मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकमेकांची साथ मिळाल्यास मोठा आधार मिळू शकतो. मुंबईतील दादर, माहीमसारख्या भागांमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची ताकद जवळपास सारखी आहे. अशा जागांवर परस्पर सामंजस्याने उमेदवार ठरवण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो.

दसरा मेळावा ठरणार निर्णायक? जागावाटपावर झाली चर्चा?

२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता राज ठाकरे यांनी गुरुवारी (दि.११) मनसे नेत्यांची बैठक आयोजित केल्याचे समजते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जागावाटप, निवडणूक रणनीती आणि स्थानिक पातळीवरील गणित यावर निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या भेटीतून घडलेले नवे समीकरण दसरा मेळाव्यातून औपचारिक घोषणेतून उलगडेल का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in