Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला पाहिजेच" असे आवाहनही केले.
Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...
Published on

बोगस मतदार यादी, मतदान यादीत फेरफार यावरून विरोधकांकडून आज मुंबई येथे 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला. यावेळी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित कार्यक्रमात सहभागी झाले. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला पाहिजेच" असे आवाहनही केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या एकजुटीनंतर पहिल्यांदाच सर्व राजकीय पक्षांची एकजूट झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारं आणि नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो, आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकेल. या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे.

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून ॲनाकोंडा हा शब्द वापरला होता. त्याच शब्दाची आठवण करत ते म्हणाले, मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला. तो कोणता ते तुम्हाला कळेल. शोलेमध्ये एक डायलॉग आहे, दूर कही रात बच्चा रोता है, माँ कहती है सोजा नही तो गब्बर आजायेगा. आज मी तुम्हाला सांगतो जागे राहा नाहीतर ॲनाकोंडा आ आजायेगा.

ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल

पुढे ते म्हणाले, "या ॲनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल. नाहीतर सुधारणार नाहीत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं एवढे सगळे धडधडीत पुरावे; रोज कुठून ना कुठून पुरावे येत आहेत तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग.. निवडणूक आयोग तर यांचे नोकर आहेत. मी ॲनाकोंडा का बोलतोय चेष्टा मस्करी म्हणून नाही बोलत आहे.. यांची भूक शमत नाहीये. आपला पक्ष चोरला, नाव चोरलं, निशाणी चोरली, अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करत आहेत, आणि तेही पुरेसं नाही म्हणून मतचोरी करायचा प्रयत्न करत आहेत. बाकी सगळे एकत्र आलेले आहेत बाकी सत्ताधारी याच्यामध्ये कोणी आलेलं नाहीयेत."

एकदाचं दूध का दूध पाणी का पाणी होऊदे

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतला आहे याचा पर्दाफाश मी करेन. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी मुख्यमंत्र्यांना आवाहन देत आहे, तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका; एकदाचं होऊदे दूध का दूध पाणी का पाणी..पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी पण मान्य केलं आहे मतचोरी झालेली आहे."

ठाकरे म्हणाले, "मी तुमच्या सर्वांवर एक जबाबदारी टाकतोय सगळे पक्ष बाजूला ठेवून एकवटलो आहोत. ज्या गोष्टी आता आम्ही करत आहोत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस जे करत आहेत तसं मी सर्वांना आवाहन करतो आहे राज्यातील नाहीतर देशातल्या की सर्वांनी आपले नाव यादीत आहे की नाही ते पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी, आपली परवानगी न घेतलेली माणसे राहतात की नाही हे पण तपासा. कारण जर शौचालयात १०० माणसे राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात?"

उद्धव ठाकरे यांचं नाव काढण्याचा प्रयत्न

पुढे ते अर्जाचा दाखल देत म्हणाले, "मी हे मतदारांना का सांगतोय कारण राज हे तू जे दाखवले दुबार, तिबार नाव आहेत, आज मी एक अर्ज दाखवतोय. त्याच्या नावाखाली एक शेरा आहे तो शेरा मी वाचतो मग नाव वाचतो. 'सदर अर्जाबाबत अर्जदार यांची भेट घेऊन सदर अर्जाची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही.' असा अभिप्राय मिळाला आहे. त्यामुळे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. हा अर्ज ज्याने केलेलाच नाही त्याच्या नावाने हा अर्ज केला आहे. त्याचा अर्ज शोधायचा कुठे? त्या अर्जदाराचे नाव आहे - उद्धव बाळासाहेब ठाकरे.. या माणसाने अर्ज केलेलाच नाही. एक दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसे आली. म्हणजे साधूसंत येती घरा तोची दिवाळी-दसरा.. दिवाळी झाली, दसरा झालं आता निवडणूक आली. मग त्यांना विचारल काय पाहिजे तुम्हाला. तर ते म्हणाले की तुम्ही सांगा टेलिफोन नंबर बरोबर आहे का? मी म्हंटलं खोटा आहे. मी सर्वांना विचारलं तर समजलं हा अर्ज आमच्यापैकी कोणीच केलेला नाही. हा अर्ज २३ ऑक्टोबरला केला आहे. कुठून केलाय? सक्षम नावाच्या app वरुन. मी यावर रीतसर तक्रार केली. तर याचा अर्थ असा माझ्या नावाने otp काढण्याचा प्रयत्न झाला आहे. हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय. म्हणजे माझ्या सकट चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे का? हे आपण शोधलं पाहिजे. नक्की काहीतरी याच्यात डाव आहे."

लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला असुसलेले

यावर सत्ताधारी पक्षावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, "कोणाची नाव टाकायची, कोणाची काढायची, कोणी किती वेळा मतदान करायच हे यांच्या हातामध्ये आहे. आमचं म्हणणं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला असुसलेले आहोतच. पण सदोष, चोरी करून जर का आधीच निकाल घेणार असाल तर मग जनेतेने ठरवायचं की निवडणुका होऊ देयच्या की नाही. लोकशाहीचा खून होतोय. खून करणारे खुर्चीवर बसलेत त्यांच्या चरणी घालीन लोटांगण आमच्या आई वडिलांनी शिकवलेले नाही. एवढी लाचारी करणारी अवलाद या महाराष्ट्राने बघितली नाही."

मतचोर फटकवला पाहिजे

शेवटी उद्धव ठाकरे यांनी मतदारांना आवाहन करत म्हटले, "आजपासून तुम्ही सगळ्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवला पाहिजे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, पण कायद्याच्या दांडुकाने आम्हाला मारणार असाल तर दांडुक्याचे काय करायचं हे निर्णय घ्यायला महाराष्ट्राची जनता आहे."

logo
marathi.freepressjournal.in