आज विधानभवनात शिंदे गट आणि ठाकरे गटात तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. अनिल परब आणि शंभुराज देसाई यांच्या खडाजंगीनंतर उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यात वाद झाला. विधानभवनाच्या आवारात नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाचा वरुण सरदेसाई यांना धक्का लागल्याने त्यांच्यात भांडण झाले. यावेळी वरुण सरदेसाई भडकले आणि त्यांनी ''इथे काय अतिरेकी घुसलेत काय?'' म्हणत संताप व्यक्त केला.
नेमके काय घडले?
उपसभापती नीलम गोऱ्हे विधानभवनाच्या आवारातून जात असताना, त्यांच्या सुरक्षारक्षकाचा धक्का आमदार वरुण सरदेसाई यांना लागला. यामुळे सरदेसाई भडकले आणि त्यांनी थेट विचारले, की "इथे काय अतिरेकी घुसलेत का? दुसऱ्यांदा धक्का लागला मला, दुसऱ्यांदा झालं हे, असे कसे धक्के लागतात?
यावर नीलम गोऱ्हे यांनी थोडं पुढे जात नम्रपणे प्रतिक्रिया दिली की, "मुद्दाम काही केलं नाही, मी शांतपणे सांगतेय तुम्हाला. तरी तुम्ही खेकसता आहात, ही कुठली तुमची संस्कृती?" असे म्हणत त्या विधानभवनात गेल्या.
वरुण सरदेसाई काय म्हणाले?
या प्रकारानंतर वरुण सरदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले, की ''वारंवार हे स्वत:ला व्हीआयपी समजणारे, एका बाजूला आम्हाला सांगण्यात येतं की जास्त लोकांना आतमध्ये घेऊन यायचं नाही. नीलम गोऱ्हे काय उपसभापती आहेत, मी त्यांच्या पदाचा मान राखतो. पण, गेल्या वेळीही आमदारांना त्यांच्यासोबत असलेल्या लोकांकडून धक्काबुक्की झाली. आम्ही इथे नाही चालणार तर कोण चालणार? नाराजी व्यक्त करायलाच पाहिजे ना? विधानभवनाच्या आत जायला, यायला हा एकमेव रस्ता आहे. खरं म्हणजे इथे प्रचंड पोलिस सिक्युरिटी असते. हे दुसऱ्यांदा घडलं. गेल्या अधिवेशनातही घडलेलं, या अधिवेशनातही घडलं. यांच्या सोबतचे बॉडीगार्ड, हे-ते.. हे लोकं कोण आहेत धक्का देणारे? आम्ही हात सोडला तर? आमदारांचा मान राखला गेला पाहिजे.''
ते पुढे म्हणाले, की ''हे मुद्दामून नाही झालं. पण, आमच्या छातीवर बिल्ले लावलेत ना? हे बिल्ले कशाला लावतो आम्ही? जर कोणी आम्हाला ओळखत नसेल, तर या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं; यासाठी बिल्ले लावतो आम्ही. उपसभापतींसाठी वेगळी बस काढा. त्यांच्यासाठी डायरेक्ट विधानभवनाच्या टेरेसवर विमान उतरवा.''
''यांच्यासोबत कोणी ओमणे, सोमणे, गोमणे येतात. आमदारांना धक्के देतात, हे सगळं बंद झालं पाहिजे'' असं वरुण सरदेसाई म्हणाले.