

मुंबई : मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला फटका बसला. पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड-विरार भागात रेल्वे मार्गावर पाणी भरल्याने चर्चगेट ते वसई रोड दरम्यान लोकल सेवा चालवण्यात होती. दरम्यान, वसई-विरारमध्ये सलग चौथ्या दिवशी संततधार पाऊस झाल्याने अनेक भागात पुरसदृश स्थिती निर्माण झाली. त्यात दिवसभर वीजपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.
सोमवारी पहाटे काही तासांतच पालघर परिसरात ३०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे विशेषतः वसई, नालासोपारा, विरार पाणी भरले. रेल्वे मार्गावरील पाण्याचा स्तर फलाटापर्यंत वाढला. तसेच संपूर्ण शहरात पाणी भरल्याने, फलाटावरील पाणी बाहेर वाहून जाणे अशक्य झाले. तसेच, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या विरारच्या आधीच थांबविण्यात आले. तर काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द केल्या. तर, काही रेल्वेगाड्या पूर्णतः रद्द केल्या.
या परिसरात विजेच्या अभावी शहरातील अनेक कंपन्यांचे मोबाईल टॉवर काम करेनासे झाल्यामुळे इंटरनेट सेवेवर प्रतिकूल परिणाम होऊन संपर्क साधणेही कठीण झाले. आधीच्याच पाण्याचा निचरा न झाल्यामुळे आजच्या पावसाची भर पडून शहराच्या अनेक भागात कंबरेभर पाण्यातून चाकरमान्यांना वाट काढावी लागली. पालिकेची परिवहन सेवा आणि ऑटोरिक्षा बंद असल्यामुळे सर्वत्र ट्रॅक्टर मधून प्रवास होतांना दिसला.
वसई पूर्वेचा वाघलरपाडा आणि मिठगर वस्ती आज तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली होती. महापालिकेच्या अग्निशामक दलाने छोटया बोटीतून जाऊन या भागात औषधे व अन्नाची पाकिटे पोहचवून मदत कार्य केले. 'मधुबन' या नव्या वस्तीत आजही पाणी साचलेले होते. वसई पश्चिमेचा सनसीटी ते गास रस्ता संपूर्ण पाण्याखाली गेलेला असल्यामुळे आजही बंद होता. सायंकाळी पावसासोबतच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विद्युत खांब कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.