
मुंबईतील वर्सोवा परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये एका नोकराने पाळीव कुत्र्यावर अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि प्राणीप्रेमी सुधीर कुदळकर यांनी ती घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसते की, नोकर कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा खेचून त्याला लिफ्टमध्ये घेऊन जातो, पट्ट्याने मारहाण करतो आणि लिफ्टमधून बाहेर पडताना त्याला लाथ मारून बाहेर काढतो. या दरम्यान तो लिफ्टमध्ये थुंकत असल्याचेही दिसून येते. कुत्रा वेदनेने कळवळतो, पण काही करू शकत नाही. हे दृश्य मनाला हेलावून टाकणारे आहे.
हा कुत्रा वर्सोवामधील रहिवासी श्रियांशी जैन यांचा असून, त्यांच्या घरातील नोकरानेच ही मारहाण केल्याचे समोर आले आहे.
या घटनेवर श्रियांशी जैन म्हणाल्या, “हा प्रकार केवळ माझ्या कुत्र्याबाबत घडलेला नाही, तर तो सर्व मुक्या प्राण्यांवर झालेला हल्ला आहे. ते स्वतःसाठी बोलू शकत नाहीत, म्हणून आपण त्यांचा आवाज होणे गरजेचे आहे,”
तसेच, श्रियांशी यांनी लोकांना आवाहन केले की, "आपल्या पाळीव प्राण्यांसोबत घरगुती कर्मचारी, सोसायटीतील सदस्य किंवा आजूबाजूचे लोक कसे वागतात यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे."
मुंबई पोलिसांचा पुढाकार -
मुंबई पोलिसही प्राणी संरक्षणाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहेत. लवकरच मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्रात सुमारे १० कोटी रुपये खर्चून एक आधुनिक केनेल कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे.
या केंद्रात सेवानिवृत्त आणि कार्यरत पोलिस कुत्र्यांसाठी उच्च प्रतीची निवास, वैद्यकीय आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असतील. सध्या मुंबई पोलिसांकडे ३३ कुत्र्यांचे विशेष पथक असून, त्यामध्ये जर्मन शेफर्ड, बेल्जियन मॅलिनॉइस, लॅब्राडोर, डोबरमन यासारख्या प्रजातींचा समावेश आहे. हे कुत्रे अंमली पदार्थ विरोधी, बॉम्ब शोध, विल्हेवाट आणि व्हीआयपी सुरक्षा युनिटमध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक कुत्र्याची देखभाल करण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी नियुक्त असतात.