

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते उद्योगपती विजयपत सिंघानिया यांना मुंबईत अखेरचा निरोप देण्यात आला. रविवारी (दि.२९) चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र गौतम सिंघानिया यांनी त्यांना मुखाग्नी दिला. उद्योगविश्वात दूरदृष्टी आणि साहसी वृत्तीमुळे ओळख असलेल्या सिंघानिया यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मुंबईत पार पडले अंत्यसंस्कार
मुंबईतील चंदनवाडी हिंदू स्मशानभूमीत कुटुंबीयांच्या उपस्थितीत विजयपत सिंघानिया यांचा अंत्यविधी पार पडला. याआधी एल.डी. रुपारेल मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. अंत्यविधीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शायना एनसी यांनी उपस्थित राहून विजयपत सिंघानिया यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रेमंडला दिली नवी दिशा
१९८० पासून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी रेमंड समूहाचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात रेमंडने प्रीमियम लाइफस्टाइल ब्रँड म्हणून मजबूत ओळख निर्माण केली. सिंघानिया यांनी रेमंडचा विस्तार सिंथेटिक फॅब्रिक्स, डेनिम, स्टील, इंडस्ट्रियल फाइल्स आणि सिमेंट अशा अनेक क्षेत्रांत केला. त्यामुळे कंपनी एक मोठा औद्योगिक समूह बनली.
पुरस्कार आणि विक्रम
व्यवसायासोबतच त्यांना विमान उड्डाणाची विशेष आवड होती. त्यांनी अनेक धाडसी कामगिरी करून वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण आणि टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००५ मध्ये हॉट एअर बलूनद्वारे सुमारे ६९,००० फूट उंची गाठत त्यांनी जागतिक विक्रम केला. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ५००० तासांहून अधिक उड्डाणासाठी १९९४ मध्ये मानद एअर कमोडोर पद दिले. २००६ मध्ये त्यांची मुंबईच्या शेरिफ (Sheriff) पदी नियुक्ती झाली.
शिक्षण क्षेत्रातील योगदान
२००७ ते २०१२ दरम्यान त्यांनी आयआयएम अहमदाबादच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्षपद भूषवले. २००० मध्ये त्यांनी रेमंड समूहाची जबाबदारी पुत्र गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली.
कौटुंबिक वादानंतर समेट
काही वर्षांपूर्वी वडील आणि पुत्रामध्ये वाद झाले होते. मात्र नंतर त्यांनी हे वाद मिटवले, अशी माहिती समोर आली होती.
दूरदृष्टी आणि साहसाचा संगम
रेमंडसारख्या नामांकित ब्रँडला जागतिक ओळख देताना आणि आकाशालाही गवसणी घालत विजयपत सिंघानिया यांनी उद्योग दोन्ही क्षेत्रात वेगळी छाप सोडली. त्यांची कारकीर्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.