Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डर

मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून सख्ख्या भावांनी आपल्याच तिसऱ्या भावाच्या कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला केला...
Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डर
Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डरप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी (पश्चिम) येथील पार्कसाईट परिसरात कौटुंबिक वादातून दुहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. ६) पहाटेच्या सुमारास घरात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघा भावांनी तिसऱ्या भावाच्या कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वडील आणि त्यांच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि धाकटा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मोठ्या आवाजात गाणी लावल्यावरून वाद

पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगर येथे विश्वकर्मा कुटुंबातील चार भाऊ एकाच इमारतीत राहत होते. त्यापैकी दोघे पोटमाळ्यावर राहत होते. गुरुवारी पहाटे सुमारे दोनच्या सुमारास सुनील विश्वकर्मा (वय ४०) यांनी मोठ्या आवाजात गाणी लावल्याचा आरोप आहे. यावरून त्यांचे भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी त्यांना जाब विचारला. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

धारदार शस्त्राने कुटुंबावर हल्ला

प्राथमिक माहितीनुसार, सुरेंद्र आणि सूरज यांनी सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा, त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा, पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा मुलगा श्लोक यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंजू आणि विवान यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.

दोघा भावांना अटक

या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघा भावांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू आहे. हल्ल्यामागचं नेमकं कारण काय, तसेच मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या वादाव्यतिरिक्त अन्य कोणतं कारण होतं का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in