शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळीतील पार्कसाईट डोंगराळ भागात शनिवारी (दि. १६) पहाटे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. वर्षा नगर येथे ही घटना घडली असून यामध्ये मिश्रा कुटुंबीयांचे घर दरडीखाली आल्याने त्यांच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. विक्रोळी पार्कसाईट या भागात झोपडपट्टीचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका येथे असतो. काही भागात संरक्षक भिंत असूनही येथे दुर्घटनेची शक्यता असते.
या घटनेत सुरेश मिश्रा (वय ५०) आणि त्यांची मुलगी शालू मिश्रा (वय १९) यांचा मृत्यू झाला असून पत्नी आरती (वय ४५) आणि मुलगा ऋतुराज (वय २०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास घडली. माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस व पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्यातून कुटुंबीयांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र बाप-लेकीचा आधीच मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर पालिकेकडून आजूबाजूच्या घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
या परिसरात २५ वर्षांपासून राहणाऱ्या छाया वसंत मकवाना यांनी सांगितले, "यावेळी आम्हाला अधिकाऱ्यांकडून कोणतीही सूचना मिळाली नव्हती. आम्ही आमच्या घरात झोपलो होतो, तेव्हा अचानक पहाटे २.३० च्या सुमारास एका घरावर मातीचा ढिगारा कोसळला आणि एक कुटुंब अडकले."
मुसळधार पावसामुळे विक्रोळी व्यतिरिक्त सायन, किंग्ज सर्कल, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरीसह अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा डोंगर व उतारांच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांमधील असुरक्षितता अधोरेखित झाली आहे.