Virar : जीवदानी डोंगरावर महाराष्ट्रातील पहिली ग्लास गॅलरी; १,५०० फूट उंचीवरून निसर्गरम्य दृश्यांचा नजारा

विरारच्या जीवदानी डोंगरावर महाराष्ट्रातील पहिली ग्लास गॅलरी उभारण्यात आली असून १,५०० फूट उंचीवरून निसर्गरम्य परिसराचा आकर्षक नजारा पाहता येणार आहे. या प्रकल्पामुळे वसई-विरारच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Virar : जीवदानी डोंगरावर महाराष्ट्रातील पहिली ग्लास गॅलरी; १,५०० फूट उंचीवरून निसर्गरम्य दृश्यांचा नजारा
Published on

विरारकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक भन्नाट आकर्षण तयार झालं आहे. डोंगर, समुद्र आणि आकाशाचा निसर्गरम्य देखावा एकाच ठिकाणी पाहता येणार आहे.

विरारमधील जीवदानी देवी मंदिर परिसरात आता महाराष्ट्रातील पहिली ग्लास गॅलरी उभारण्यात आली आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १,५०० फूट उंचीवर असलेल्या या गॅलरीतून भाईंदर ते सफाळेपर्यंतचा निसर्गरम्य पट्टा पाहण्याचा अनोखा अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. त्यामुळे वसई-विरारच्या पर्यटनात मोठी भर पडणार आहे.

श्रद्धास्थळात नवं आकर्षण

श्रद्धेचं प्रमुख केंद्र असलेल्या या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आता त्याच ठिकाणी उभारलेली ही काचेची गॅलरी भाविकांसोबतच पर्यटकांसाठीही आकर्षण ठरणार आहे.

मजबूत रचना; २०० पर्यटकांची क्षमता

सुमारे ३० मीटर परिघाची ही गॅलरी विशेष 'सँडविच' काचांपासून तयार करण्यात आली असून प्रत्येक काच ८ बाय ८ फूट आकाराची आणि ३९ मिमी जाडीची आहे. एका काचेवर एकावेळी ५० जण उभे राहू शकतात, तर संपूर्ण गॅलरी साडेतीन टन वजन पेलण्यास सक्षम आहे. एकाच वेळी तब्बल २०० पर्यटक या गॅलरीत फिरू शकतात.

पाहा आकर्षक दृश्ये

८४ लाखांचा प्रकल्प; आव्हानात्मक काम

या प्रकल्पासाठी सुमारे ८४ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. उंच डोंगरावर या जड काचा पोहोचवणे हे मोठं आव्हान ठरलं. त्यासाठी रोपवे, विविध प्रकारच्या क्रेन आणि विशेष ३६० डिग्री फिरणाऱ्या क्रेनचा वापर करून हे काम पूर्ण करण्यात आलं.

सूर्यास्ताचा खास अनुभव

महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून, विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी अर्नाळा किनाऱ्यापासून सफाळ्यापर्यंत पसरलेला निसर्ग या गॅलरीतून अनुभवता येणार आहे.

Virar : जीवदानी डोंगरावर महाराष्ट्रातील पहिली ग्लास गॅलरी; १,५०० फूट उंचीवरून निसर्गरम्य दृश्यांचा नजारा
कोकणातील कातळशिल्पांवर बनणार आंतरराष्ट्रीय माहितीपट; सरकारकडून १४.५० कोटींच्या निधीला मान्यता

पर्यटनाला चालना

धार्मिक स्थळाला आधुनिक आकर्षणाची जोड मिळाल्याने येत्या काळात या भागातील पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in