निवडणुकीपर्यंत ‘वेट अँड वॉच’; मविआच्या माजी नगरसेवकांचा सावध पवित्रा, महायुतीत प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वधारली

निवडणुकीनंतर पुढील भूमिका घेऊ, असा सावध पवित्रा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे...
निवडणुकीपर्यंत ‘वेट अँड वॉच’; मविआच्या माजी नगरसेवकांचा सावध पवित्रा, महायुतीत प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वधारली

गिरीश चित्रे/मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदलीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताबदलाचे परिणाम काय होतील? भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या राज्यातील महायुतीला मतदारराजाचा कौल मिळतो का, याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे. निवडणुकीनंतर पुढील भूमिका घेऊ, असा सावध पवित्रा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून लोकसभेत महायुतीला यश मिळाले तर महायुतीत प्रवेशासाठी माजी नगरसेवकांची रांग लागू शकते.

लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या आहेत. कोणत्याही क्षणी लोकसभेची निवडणूक जाहीर होऊ शकते. विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ‘मोदींची गॅरंटी’, एकनाथ शिंदेंचे दौरे, तत्काळ काम तडीस नेणे यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पसंती दिली जात आहे. महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी भाजप, शिंदे यांनाच पसंती दर्शवली असून आतापर्यंत महाविकास आघाडीच्या ५० हून अधिक माजी नगरसेवकांनी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. महायुतीतील इनकमिंग सुरूच असून भविष्यात मविआचे अनेक माजी नगरसेवक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उलथापालथ होण्याचे संकेत भाजपच्या गोटातून मिळत आहेत.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पसंती दिली. महाविकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीचा कौल जाहीर झाल्यानंतरच, पुढील निर्णय घेणार असल्याचे माजी नगरसेवकांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in