Mumbai : 'फूल' बनू नका! १ एप्रिलनिमित्त पश्चिम रेल्वेची जनजागृती मोहीम; प्रवाशांना सुरक्षेचा संदेश

एप्रिल फूल डे दरवर्षी १ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी मित्र, कुटुंबीय हलक्या-फुलक्या खोड्या करून विनोदाने फसवत असतात. हा दिवस...
Mumbai : 'फूल' बनू नका! १ एप्रिलनिमित्त पश्चिम रेल्वेची जनजागृती मोहीम; प्रवाशांना सुरक्षेचा संदेश
Mumbai : 'फूल' बनू नका! १ एप्रिलनिमित्त पश्चिम रेल्वेची जनजागृती मोहीम; प्रवाशांना सुरक्षेचा संदेश
Published on

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एप्रिल फूल दिनाच्या पार्श्वभूमीवर वेस्टर्न रेल्वेने विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे प्रवाशांना धोकादायक सवयी टाळण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

पश्चिम रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत संदेश दिला आहे, "वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडताना 'फूल' बनू नका, धावत्या ट्रेनमधून बाहेर लटकताना 'फूल' बनू नका, रुळांवर कचरा टाकून 'फूल' बनू नका तसेच तिकीट न घेता प्रवास करून 'फूल' बनू नका."

सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य

प्रवाशांनी सुरक्षितता आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे. तसेच, फुटओव्हर ब्रिजचा वापर करावा आणि कचरा नेहमी डस्टबिनमध्ये टाकावा, असेही सोशल मीडियाद्वारे सांगण्यात आले आहे.

स्मार्ट आणि सतर्क रहा

याशिवाय, लांबलचक तिकीट रांगा टाळण्यासाठी रेलवन अ‍ॅपचा वापर करण्याचा सल्ला रेल्वेकडून देण्यात आला आहे. ट्रेन सुरु असताना डब्याच्या आत सुरक्षित राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

१ एप्रिल - एप्रिल फूल डे

एप्रिल फूल डे दरवर्षी १ एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी मित्र, कुटुंबीय हलक्या-फुलक्या खोड्या करून विनोदाने फसवत असतात. हा दिवस अनेक देशांमध्ये साजरा केला जात असला तरी तो अधिकृत सुट्टीचा दिवस नाही.

बनावट संदेशांपासून सावधान

दरम्यान, जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर एक एप्रिल फूलचा प्रकार समोर आला आहे. काही फसवणूक करणारे नागरिक व्हॉट्सअ‍ॅपवर "वॉर लॉकडाउन" किंवा "दिल्ली पार्टिअल लॉकडाउन" अशा नावांची पीडीएफ फाईल पाठवत आहेत. या फाईल्समध्ये भारत सरकारचा अधिकृत लोगो वापरून भीती निर्माण केली जात आहे. मात्र, या फाईल्स अधिकृत नसून 'फिशिंग' चे साधन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in