Mumbai : फुटीचे राजकारण सहन करणार नाही; पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचे राजकारण अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी दिला.
फुटीचे राजकारण सहन करणार नाही; पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा इशारा
फुटीचे राजकारण सहन करणार नाही; पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा इशारा(Photo-X/@SunetraA_Pawar)
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचे राजकारण अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी दिला. तसेच समाज आणि जातींमध्ये दरी निर्माण करू पाहणाऱ्या शक्तींना संघटनेत कोणतेही स्थान असणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पक्षाच्या हिताचे रक्षण करणे ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचे सांगत त्यांनी इशारा दिली की, जर कोणी पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, तर कठोर निर्णय घेण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही.

त्या म्हणाल्या, ‘राजकारणाच्या नावाखाली जाती-धर्मांमध्ये फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना राष्ट्रवादी काँग्रेस कधीही थारा देणार नाही. अल्पसंख्याक, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी आणि समाजातील सर्व घटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे पवार म्हणाल्या. समाजातील सर्व घटकांनी सलोख्याने राहावे असे वातावरण निर्माण करण्यासाठी पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहील, असे सांगून त्या म्हणाल्या की, या उद्दिष्टासाठी आवश्यक असल्यास राजकीय तडजोडीही स्वीकारल्या पाहिजेत.

येत्या काळात होणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर शहरी भागात पक्षाची उपस्थिती मजबूत करण्याच्या गरजेवरही राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी भर दिला. शहरी भागातील मतदारसंघांची संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता असून, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विशेष नियोजन आणि प्रभावी कार्यक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.

पवार म्हणाल्या की, प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘ऑक्सिजन’ आहे. त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना ‘माझा बूथ, माझे गाव’ या संकल्पनेअंतर्गत बूथ पातळीवर काम करण्याचे आवाहन केले.

नेते आणि पदाधिकाऱ्यांना इशारा देताना पवार म्हणाल्या की, पक्षाची प्रतिमा जपणे ही सर्वांची सामायिक जबाबदारी आहे. ‘पक्षाची प्रतिमा डागाळण्यापासून रोखणे ही माझ्यासह सर्वांचीच जबाबदारी आहे. मला कोणतीही कठोर भूमिका घेणे भाग पडेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी,’ असे त्या म्हणाल्या.

कठोर निर्णय घेण्यास घाबरणार नाही

पक्षासाठी कठीण निर्णय घेण्यास त्या कचरणार नाहीत. मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. त्यात कोणताही अनावश्यक हस्तक्षेप झाल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाईल," असे त्या म्हणाल्या. संघटनेच्या हितासाठी कडक निर्णय घेताना आपण अजित पवारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू, असेही त्यांनी नमूद केले.

विचारसरणीशी तडजोड नाही

गेल्या २७ वर्षांतील पक्षाच्या प्रवासाची आठवण करून देताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिली आणि विरोधी पक्षातही बसली आहे. पण आपल्या विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही. "पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देते की, भविष्यातही आम्ही तसे करणार नाही," असे त्या म्हणाल्या.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून पुढे आल्यानंतर पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला असता, तर महाराष्ट्राचा राजकीय इतिहास वेगळा असता, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in