
नवी मुंबईच्या उरण येथील यशश्री शिंदे (वय- २२) या तरुणीच्या हत्येप्रकरणी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून दाऊद शेख (२४) याला अटक केली आहे.
२०१९ मध्ये संशयित आरोपी दाऊद शेख आणि यशश्री यांच्यातील मैत्रीबाबत तिच्या वडिलांना समजल्यावर त्यांनी शेखला भररस्त्यात मारहाण केली होती. तसेच, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर, तो तुरुंगातून बाहेर आला आणि नंतर तो कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी गेला. तिथे तो बस चालक म्हणून काम करीत होता.
लव्ह ट्रँगलमुळे नात्यात दुरावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लव्ह ट्रँगलमुळे दोघांमधील नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली होती आणि त्यामुळे शेख प्रचंड चिडला होता.
शेख २२ जुलैलाच उरणमध्ये आला
क्राइम ब्रँचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कॉल रेकॉर्डनुसार शेख २२ जुलै रोजी उरणला आला आणि २५ जुलैपासून त्याचा फोन बंद झाला." शेखची निराशा त्याने केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्ट होते, असे पोलिसांनी सांगितले. २५ जुलै रोजी त्यांच्यात काय झाले ज्यामुळे मुलीवर चाकूने वार करून खून करण्यात आला, याचा तपास सुरू आहे. आरोपीला नवी मुंबईत आणल्यानंतर पुढील चौकशी केली जाईल.
त्या सोशल मीडिया पोस्ट खोट्या
दरम्यान, 'क्रूर' हत्येबाबतच्या सोशल मीडियावरील पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्टीकरण झोन एकचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिले आहे. तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. "तिच्या गुप्तांगावर वार करण्यात आले, हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली, अशा आशयाच्या ज्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहेत, त्या सर्व दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत." हत्येमागे लव्ह 'जिहाद'चा हेतू नसून लव्ह ट्रँगल असल्याची पुष्टी पोलिसांनी दिली.