
दहा वर्षांपूर्वी लखनऊमध्ये एका तरुणाच्या आईला एका व्यक्तीने मारहाण केली होती. त्या अपमानाचा सूड घेतला गेला तब्बल दहा वर्षांनंतर आणि तोही थेट हत्या करून! या थरारक घटनेचा शेवट इतका नाट्यमय होता, की ती गोष्ट एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटासारखी वाटावी, पण ही घटना खरी आहे. या तरुणाने बदला घेण्यासाठी दहा वर्ष त्या व्यक्तीला गल्लोगल्लीत शोधलं. अखेर, त्याला एके दिवशी आपला 'शिकार' सापडलाच आणि त्याने रस्त्यावरच त्याची निर्घृण हत्या केली.
ही संपूर्ण हत्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती, पण आरोपीची ओळख पटवणं पोलिसांसाठी सोपं नव्हतं. मात्र, आरोपीच्या एका चुकीमुळे पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला आणि हत्येची संपूर्ण सुत्रं उलगडली.
ही घटना लखनऊमधील इंदिरानगर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सोनू कश्यप, सनी कश्यप, सलमान, रंजीत कुमार आणि रहमत अली या पाच जणांना अटक केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज आहे.
मनोजच्या हत्येचा कट -
मनोज लखनऊ येथे नारळ पाणी विकण्याचं काम करायचा. दहा वर्षांपूर्वी एका वादातून त्याने सोनू कश्यपच्या आईला मारहाण केली होती. तेव्हापासून सोनू याच्या मनात अपमानाचा सूड घेण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने दहा वर्ष मनोजला शोधलं. पण, मनोज सापडला नाही. मार्च २०२५ दरम्यान मुंशी पुलिया परिसरात मनोज दिसला आणि इथूनच त्याच्या हत्येचा कट रचण्यास सुरुवात झाली.
हे काम एकट्या सोनूच्या आवाक्यातलं नव्हतं. यासाठी सोनूने दारूची पार्टी देतो सांगून चार मित्रांना प्लॅनमध्ये समाविष्ट करून घेतलं. त्यांनी मनोजच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. १९ मे रोजी मनोज एकटा असताना त्याला गाठलं आणि त्याची क्रूरपणे हत्या केली. या घटनेचा थरार CCTV मध्ये दिसतोय. रात्री साडेनऊच्या सुमारास हे चौघेही रस्त्यावर मनोजला लोखंडी रॉडने मारताना दिसताहेत. त्यांनी मनोजला अर्धमेल्या अवस्थेत सोडून पसार झाले.
उपचारादरम्यान मनोजचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असले, तरी त्यांचे चेहरे दिसत नसल्याने त्यांची ओळख पटवणं अशक्य होतं.
पाहा व्हिडिओ -
सोशल मीडियावर सापडले आरोपी -
दरम्यान, मनोजची हत्या केल्यानंतर सोनू आणि त्याच्या साथीदारांनी ठरल्याप्रमाणे दारू पार्टी केली. त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आणि अखेर पोलिसांना आरोपी सापडले. या पार्टीमध्ये एका तरुणाने तोच नारिंगी रंगाचा शर्ट घातला होता जो CCTV फुटेजमध्ये दिसत होता. याच धाग्यावरून पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पाचही आरोपींना शोधून काढले.
इंदिरा नगर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्हा मान्य केला. या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, सध्या त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.