वयाच्या ८०व्या वर्षी पहिल्यांदाच पाहिला समुद्र; लाटांनी पायाला स्पर्श करताच आजोबांनी जे केलं, ते थेट मनाला भिडेल; पाहा VIDEO

ओडिशातील चंद्रभागा बीचवर मुलाने ८० वर्षीय वडिलांना पहिल्यांदाच समुद्र दाखवला. समुद्र पाहताच त्यांनी केलेला नमस्कार आणि भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.
वयाच्या ८०व्या वर्षी पहिल्यांदाच पाहिला समुद्र; लाटांनी पायाला स्पर्श करताच आजोबांनी जे केलं, ते थेट मनाला भिडेल; पाहा VIDEO
वयाच्या ८०व्या वर्षी पहिल्यांदाच पाहिला समुद्र; लाटांनी पायाला स्पर्श करताच आजोबांनी जे केलं, ते थेट मनाला भिडेल; पाहा VIDEO
Published on

वयाच्या ऐंशीव्या वर्षी पहिल्यांदाच समुद्र पाहणाऱ्या एका आजोबांचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ओडिशातील कोणार्कजवळील चंद्रभागा समुद्रकिनारी मुलाने दिलेल्या सरप्राईजमुळे हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. समुद्र पाहिल्यानंतर आजोबांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, कृतज्ञतेची भावना आणि निरागस प्रतिक्रिया पाहून हा व्हिडीओ हजारो नेटकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे.

वयाच्या ८०व्या वर्षी पाहिला समुद्र...

हा व्हिडीओ ओडिशामधील कोणार्कजवळील चंद्रभागा बीचवरील आहे. @bhukkhad_musafir या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलाने हा खास क्षण शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच तो सांगतो, "बाबांनी आयुष्यात कधीच समुद्र पाहिलेला नाही. आज मी त्यांना पहिल्यांदाच समुद्रकिनारी घेऊन आलो आहे. त्यांची पहिली प्रतिक्रिया पाहूया."

समुद्रकिनाऱ्यावर पोहोचताच वृद्ध वडील काही क्षण नुसतेच अथांग समुद्राकडे पाहत राहतात. त्यानंतर ते दोन्ही हात जोडून समुद्राला नमस्कार करतात. काही क्षणांनी लाट त्यांच्या पायाला स्पर्श करते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.

"इतकी सुंदर गोष्ट आयुष्यात कधीच पाहिली नव्हती..."

लाटा पायाला स्पर्श करताच मुलगा हसत म्हणतो, "बाबा, पाणी तुमच्या पायापर्यंत आलंय... काय वाटतंय?" त्यावर भारावलेल्या आवाजात वडील म्हणतात, "इतकी मोठी... इतकी सुंदर गोष्ट आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. स्वप्नातही असा समुद्र पाहिला नव्हता... फक्त पाहतच राहिलो." त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि डोळ्यांतील समाधानाचा क्षण कॅमेऱ्यात कायमचा कैद झाला.

"हीच आमची सर्वात मोठी कमाई"

हा व्हिडीओ शेअर करताना मुलाने भावनिक कॅप्शन लिहिलं आहे - "वयाच्या ८०व्या वर्षी बाबांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला. चेहऱ्यावर हास्य होतं आणि डोळ्यांत लहान मुलासारखं कुतूहल. काही आनंदांना वयाचं बंधन नसतं... फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात. बाबांच्या चेहऱ्यावरचं हे हास्य हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे."

नेटकऱ्यांच्याही भावनिक प्रतिक्रिया...

हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरीही भावनिक झाले आहेत. एका युजरने लिहिलं, "समुद्र पाहताच त्यांनी सर्वात आधी निसर्गाला नमस्कार केला. निसर्गाचं खरं मोल अजूनही या पिढीला माहीत आहे." दुसऱ्या युजरने म्हटलं, "बाबांनी हात जोडून समुद्राला केलेला नमस्कार पाहून डोळ्यात पाणी आलं. इतका साधेपणा आणि नम्रता आज क्वचितच पाहायला मिळते."

तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, "हीच ती पिढी... जी अजूनही मातीशी, निसर्गाशी आणि साधेपणाशी जोडलेली आहे."

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in