

पंजाब येथील जालंधर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) स्थानिक नेते लकी ओबेरॉय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. ६) सकाळी मॉडेल टाऊन येथील गुरुद्वाराबाहेर त्यांच्या महिंद्रा थार गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गाडीची काच फुटली आणि गोळी लागून ओबेरॉय गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
डॉक्टर काय म्हणाले?
लकी ओबेरॉय यांना दाखल केलेल्या श्रीराम रुग्णालयाचे डॉ. विशाल यांनी सांगितले की,
"सत्येंद्रपाल सिंग उर्फ लकी ओबेरॉय यांना सकाळी सुमारे ८ वाजता रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान त्यांच्यावर ८ ते ९ गोळ्या झाडण्यात आल्याचे आढळले. त्यांना तातडीने सीपीआर दिला तसेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले, मात्र सर्व प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत."
पोलिसांचा तपास सुरु
पीटीआयच्या वृत्तानुसार, या घटनेनंतर पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून फरार झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोण होते लकी ओबेरॉय?
लकी ओबेरॉय हे जालंधरमधील आम आदमी पक्षाचे (AAP) स्थानिक नेते होते. ते जालंधर कॅन्ट मतदारसंघाचे आपचे प्रभारी राजविंदर थिआरा यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या पत्नी सिमरज्योत कौर यांनी यापूर्वी नगरपरिषद निवडणूक आपच्या तिकीटावर लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.