

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी रविवारी (दि. २६) एक नवा व्हिडीओ शेअर केला. या आंदोलनाला साथ देणाऱ्या देशभरातील समर्थकांचे त्यांनी मनापासून आभार मानले. तसेच, "ही केवळ सुरुवात आहे. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे," असा संदेशही त्यांनी दिला.
'३७ दिवसांचा प्रवास खूप कठीण होता'
व्हिडीओमध्ये दिपके म्हणाले, गेल्या ३७ दिवसांत जे काही घडले ते अत्यंत कठीण होते. हा संघर्ष केवळ माझ्यासाठी नव्हता, तर संपूर्ण टीमसाठी मोठी परीक्षा होती. आता आंदोलन संपल्यानंतर काय होईल, याची चिंता न करता शांत झोप घेता येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
देशभरातील समर्थकांचे आभार
देशभरातील CJP समर्थकांनी कठीण काळात पक्षावर विश्वास ठेवला, साथ दिली आणि टीका होत असतानाही आंदोलनाला पाठिंबा दिला, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
"देशभरातील प्रत्येक समर्थकाचे मनापासून आभार. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्या पाठीशी उभे राहिलात. तुमच्या पाठिंब्याशिवाय हे यश शक्य झाले नसते," असे दिपके म्हणाले.
टायफॉइडमुळे भेट नाही
जंतर-मंतरवर उपस्थित असलेल्या अनेक समर्थकांना प्रत्यक्ष भेटता आले नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांना टायफॉइड झाला असून १०१ अंश ताप असल्यामुळे घरी परतावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
"जंतर-मंतरवर माझी वाट पाहणाऱ्या प्रत्येकाची मी माफी मागतो. प्रकृती ठीक नसल्यामुळे मी सर्वांना भेटू शकलो नाही," असे ते म्हणाले.
'देशासाठी जे केलं, त्याला सलाम'
आंदोलनाच्या संपूर्ण काळात जंतर-मंतरवर ठामपणे उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांचेही त्यांनी कौतुक केले. "देशासाठी तुम्ही जे केलं, त्याला माझा सलाम. तुमच्याशिवाय हे यश शक्य झाले नसते. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो," असे दिपके यांनी सांगितले.
टीकाकारांना श्रेय
दिपके यांनी पक्षावर टीका करणाऱ्यांचेही आभार मानले. त्यांच्या टीकेमुळेच पक्षाला स्वतःमध्ये सुधारणा करता आल्याचे त्यांनी सांगितले. "ज्यांनी आमच्यावर टीका केली, प्रश्न उपस्थित केले, त्यांचेही आभार. तुमच्या टीकेमुळे आम्ही अधिक सक्षम झालो. CJP ला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. ही केवळ सुरुवात आहे," असे ते म्हणाले.
३६ दिवसांनंतर आंदोलन मागे
शनिवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP ने जंतर-मंतरवरील ३६ दिवसांचे आंदोलन मागे घेतले. सरकारने पक्षाच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याचा दावा CJP ने केला.
मागणी मान्य केल्याचा CJP चा दावा
CJP चे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे, भविष्यात कारवाई न करण्याचे आश्वासन आणि आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली आहे.
चार आठवड्यांनंतर पुन्हा बैठक
सरकार आणि CJP यांच्यातील चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, परीक्षा सुधारणा आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांबाबत पुढील चार आठवड्यांनंतर पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती CJP ने दिली.
NEET आंदोलनामुळे देशभरात चर्चा
NEET-UG २०२६ पेपरफुटी, CBSE च्या मूल्यमापन प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी CJP ने २० जूनपासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांसह विविध विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला होता. २० जुलै रोजी संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्षही झाला होता. त्यानंतर केंद्र सरकार आणि CJP यांच्यात चर्चेची प्रक्रिया सुरू झाली.