'अग्निपथ’वरून आंदोलनाची ठिणगी,सैन्य भरतीच्या नव्या योजनेला तरुणांचा विरोध

आंदोलकांनी बक्सरमध्ये रेल्वे ट्रॅक अडवला तर मुझफ्फरपूरमधील मादीपूरमध्ये जाळपोळ करून रस्ता रोको करण्यात आला
'अग्निपथ’वरून आंदोलनाची ठिणगी,सैन्य भरतीच्या नव्या योजनेला तरुणांचा विरोध
ANI
Published on

सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये आंदोलनाची ठिणगी पडली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने सुरू असून तरुणांनी या योजनेला तीव्र विरोध केला आहे.

आंदोलकांनी बक्सरमध्ये रेल्वे ट्रॅक अडवला तर मुझफ्फरपूरमधील मादीपूरमध्ये जाळपोळ करून रस्ता रोको करण्यात आला. याशिवाय आरा येथेही बराच गदारोळ झाला. पोलीस आणि जीआरपीने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते योजना मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

सैन्य भरती कार्यालयासमोर निदर्शने

बुधवारी मुझफ्फरपूरमध्ये शेकडो लोक लाठ्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. प्रथम आंदोलक एआरओ (लष्कर भरती कार्यालय) येथे पोहोचले. तेथे निदर्शने करुन निषेध करण्यात आला. यानंतर आंदोलकांनी मादीपूर येथे जाळपोळ करून रास्ता रोको केला. यासोबतच रस्त्याच्या आजूबाजूचे फलक, होर्डिंग्जची तोडफोड करण्यात आली.

बक्सरमध्ये आश्वासनानंतर रेल रोको मागे घेतला

बक्सरमध्ये आंदोलकांनी बक्सर स्टेशनच्या गोदामाजवळ दिल्ली-कोलकाता रेल्वे ट्रॅक अडवला. घटनास्थळी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वे स्टेशन, बक्सरसह शहर पोलीस ठाणे, रेल्वे व्यवस्थापक पोहोचले. आंदोलकांची समजूत घातल्यानंतर ट्रॅकवरून तरुणांना हटवून रेल्वे सेवा सुरू करण्यात आली.

केंद्र सरकारची ‘अग्निपथ योजना’ तरुणांना ४ वर्षे सैन्यात सेवा करण्याची मिळणार संधी

logo
marathi.freepressjournal.in