
मध्यप्रदेशातील भोपाळ येथील जांबोरी मैदानावर आज पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त 'लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तिकरण महासंमेलन' महिलांच्या उत्साही वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. पंतप्रधानांनी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली वाहत, पुष्पांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित महिलांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करण्यासाठी खास सिंदूरी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या.
या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि ३०० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले. त्यांनी १२७१ अटल ग्राम सुशासन भवनांसाठी ४८३ कोटी रुपये दिले. त्यांनी दातिया आणि सतना विमानतळांसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे स्मरण करताना त्यांना 'महिला सक्षमीकरणाची दीपस्तंभ' अशी उपमा दिली. महिला सक्षमीकरण परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी हात जोडून महिला शक्तीला नमस्कार केला. ते म्हणाले की, इतक्या मोठ्या संख्येने माता आणि भगिनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. तुमचे दर्शन घेण्याचा मला आनंद मिळाला.
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर, हे नाव ऐकताच मन आदराने भरून जाते. त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतात. आज लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती आहे. राष्ट्र उभारणीसाठीच्या अथक प्रयत्नांना प्रेरणा देण्याची आणि त्यात योगदान देण्याची ही १४० कोटी भारतीयांसाठी एक संधी आहे. त्या म्हणायच्या की, प्रशासनाचा खरा अर्थ म्हणजे लोकांची सेवा करणे आणि त्यांचे जीवन सुधारणे."
पुढे ते म्हणाले, २५०-३०० वर्षांपूर्वी जेव्हा देश गुलामगिरीच्या साखळदंडात जखडला होता. त्या काळात अहिल्यादेवी यांनी इतके महान कार्य केले हे सांगणे सोपे आहे, पण तसे काम करणे सोपे नाही. त्यांनी कधीही देवाची सेवा आणि लोकांची सेवा वेगळी मानली नाही. असे म्हटले जाते की त्या नेहमीच शिवलिंग सोबत घेऊन जात असत. त्या आव्हानात्मक काळात, काट्यांनी भरलेल्या राज्याचे नेतृत्व करताना, त्यांनी राज्याच्या समृद्धीला एक नवीन दिशा दिली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांनी सामाजिक सुधारणांसाठी खूप काम केले. त्यांनी लोकांची सेवा करण्यासाठी महिलांची एक विशेष तुकडी तयार केली होती. त्या राष्ट्र उभारणीत महिला शक्तीच्या योगदानाचे प्रतीक आहेत. अहिल्याबाईंचे प्रेरणादायी विधान कधीही विसरता कामा नये. त्या म्हणायच्या की, आपल्याकडे जे काही आहे ते जनतेचे ऋण आहे जे आपल्याला फेडायचे आहे. आज सरकार अहिल्याबाईंच्या मूल्यांचे पालन करत काम करत आहे.
आम्ही तीन कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत दीड कोटींहून अधिक बहिणी लखपती दीदी बनल्या आहेत याचे मला समाधान आहे. सरकारने विमा मित्र बनवण्याची मोहीम देखील सुरू केली आहे. देशाला विमा सुरक्षा देण्यात आता आपल्या बहिणी आणि मुली मोठी भूमिका बजावत आहेत.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या विविध महिला कल्याण योजनांची माहिती दिली. त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘उज्ज्वला योजना’, ‘महिला स्वावलंबन अभियान’ यांसारख्या योजनांचा उल्लेख करत सांगितले की, महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास अपूर्ण आहे. अहिल्याबाईंप्रमाणेच प्रत्येक स्त्रीला सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, आज पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने प्रशासन चालवत आहेत, त्यावरून संपूर्ण प्रशासन देवी अहिल्याबाईंच्या मार्गावर चालत असल्याचे दिसते. या कार्यक्रमात महिला सशक्तीकरणाशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. स्व-सहायता गटांच्या महिलांनी आपले अनुभव मांडले, तसेच यशोगाथांची सादरीकरणेही झाली. अनेक महिलांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सन्मानितही करण्यात आले.