अहमदाबाद : घराघरांत पती-पत्नीमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होत असतात. मात्र, गुजरातमधील अहमदाबादमध्ये जेवणात बनवलेल्या भाजीवरून झालेल्या वादाला धक्कादायक वळण मिळालं. शुक्रवारी (दि. ६) पतीने जेवणात हीच भाजी का बनवली, असा प्रश्न विचारल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. या भांडणादरम्यान पत्नीने माजी सैनिक असलेल्या पतीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबादमधील नरोडा स्मार्ट सिटी परिसरात ही घटना घडली. मृत व्यक्तीचं नाव दिलीप खराडी असं असून, ते यापूर्वी भारतीय लष्करात कार्यरत होते. लष्करातील सेवा सोडल्यानंतर ते चालक म्हणून काम करत होते. दिलीप हे पत्नी निर्मला आणि दोन मुलांसोबत राहत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीप आणि निर्मला यांच्यात गेल्या काही काळापासून घरगुती जबाबदाऱ्या आणि इतर कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत होते.
जेवणातल्या भाजीवरून वाद पेटला
घटनेच्या रात्री जेवणात बनवलेल्या भाजीवरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. दिलीप यांनी भाजीबाबत प्रश्न विचारल्यानंतर सुरू झालेलं भांडण काही वेळातच वाढलं. याच वादादरम्यान निर्मला यांनी स्वयंपाकघरातील चाकू उचलून दिलीप यांच्या छातीवर वार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या हल्ल्यात दिलीप गंभीर जखमी झाले. घटनेनंतर निर्मलाने दिलीप यांचे भाऊ मुकेश यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांना बोलावून घेतलं. त्यानंतर जखमी दिलीप यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
वरिष्ठ पोलिस अधिकारी व्ही. एन. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पती-पत्नीमध्ये आधीपासूनच कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. त्या रात्री पुन्हा भांडण झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं.
दिलीप यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी नरोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पत्नीला अटक, पुढील तपास सुरू
या प्रकरणात पोलिसांनी निर्मला यांना अटक केल्याचं वृत्त आहे. त्यांची चौकशी सुरू असून, नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा प्रकार घडला, याचा तपास केला जात आहे.
जेवणातल्या भाजीवरून सुरू झालेल्या वादानंतर एका कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दोन मुलांवर वडिलांचं छत्र हरपलं आहे.