"१० सेकंदांत लपलो नसतो तर आज जीवंत नसतो..."; बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा थरारक अनुभव

अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला निघालेले एअर इंडियाचे एआय-१७१ हे विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. या अपघातात २४१ प्रवाशांसोबतच बी जे हॉस्पिटलच्या २४ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा देखील मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली ती दुपारी दीडची वेळ. मेडिकलचे विद्यार्थी आपल्या मित्रांसमवेत जेवायला बसले होते. भरल्या ताटावरच त्यांना मृत्यूने कवटाळले.
"१० सेकंदांत लपलो नसतो तर आज जीवंत नसतो..."; बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा थरारक अनुभव
Published on

अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला निघालेले एअर इंडियाचे एआय-१७१ हे विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. या अपघातात २४१ प्रवाशांसोबतच बी जे हॉस्पिटलच्या २४ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा देखील मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली ती दुपारी दीडची वेळ. मेडिकलचे विद्यार्थी आपल्या मित्रांसमवेत जेवायला बसले होते. भरल्या ताटावरच त्यांना मृत्यूने कवटाळले. तर, काही विद्यार्थी यातून सुदैवाने बचावले आहेत. त्यांनी इतक्या मोठ्या दुर्घटनेतून स्वत:चा जीव कसा वाचवला याबद्दल सांगितले. त्यांचा हा अनुभव मन हेलावून टाकणारा आहे.

विमानाचा आवाज आला, की धडकी भरते -

बी जे मेडिकलचा एमबीबीएसचा विद्यार्थी जयराज याने सांगितले, की मी आणि माझे मित्र दिडच्या दरम्यान बिल्डिंगमध्ये जेवत होतो. अचानक मोठा आवाज आला. आम्हाला आधी वाटलं सिलेंडर स्फोट झाला. अचानक आजूबाजूला धूर पसरला. आम्हाला समजेना काय झालं. काहीजण खाली पडले. आम्ही स्वत: ला वाचवण्यासाठी पळू लागलो. पहिल्या मजल्यावरून काहीजणांनी उड्या मारल्या. आम्हाला प्रवेशद्वारावर बाहेर जायला थोडी जागा दिसली. आम्हाला वाटलंही नाही, की आम्ही बाहेर पडू. समजलेही नाही, की प्लेन क्रॅश झाले. आम्हाला समजेना बॉम्ब स्फोट झालाय की सिलेंडर स्फोट झाला आहे? काहीजण जमिनीवर पडले होते; आम्ही त्यांच्यावरून उड्या मारून गेटबाहेर आलो. नाहीतर आमचे काय झाले असते हे आम्ही सांगूही शकत नाही. तसेच जयराज याने सांगितले, की आता विमानाच्या आवाजानेही धडकी भरते.

मित्राचा फोन आला आम्ही आत अडकलोय -

तर, दुसऱ्या प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने सांगितले, की मी बाल्कनीमध्येच होतो. मी पाहिलं विमान आधी झाडाला आदळले आणि पहिला धमाका झाला. काहीच समजलं नाही. दूसरा स्फोट निवासी भागात झाला, आगीचा गोळा दिसला आणि सर्वत्र धूर पसरला. मेसच्या येथे सिलेंडर स्फोट होताना पाहिले. मग आम्ही पळत खाली गेलो.

पुढे त्याने सांगितले, की माझ्या एका मित्राचा फोन आला आम्ही आत अडकलोय. मग आम्ही धावत गेलो. सोबत फायर एक्सटिंग्विशर घेऊन गेलो थोडी आग विझवली आणि जेवढ्या शक्य तेवढ्या विद्यार्थ्याना बाहेर आणलं. मग फायर ब्रिगेड, CRPFचे जवान आले. त्यानंतर आम्ही आमच्या जखमी मित्रांना घेऊन बाइक आणि रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेले.

विमानाचा भाग रस्त्यावर पडल्याने रस्ता ब्लॉक झाला होता. त्यामुळे रुग्णवाहिकेला आत येण्यास अडथळा निर्माण झाला आणि रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहचल्या. तर धुरामुळे पाठचा रस्ताही ब्लॉक झाला होता.

विद्यार्थी इतक्या दहशतीत आहेत, की त्यांची गच्चीवर झोपण्याची हिंमतही होत नाही, असेही त्याने सांगितले.

दहा सेकंदामध्ये लपलो नसतो तर जीवंत नसतो -

तर, प्रतिक्रिया देणाऱ्या तिसऱ्या विद्यार्थ्याने वेळेतच धाव घेतली नसती तर आज तो जीवंत नसता अशी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, आम्ही तर सात जण एकत्र होतो. नुकतेच आम्ही जेवून पायऱ्या उतरत होतो. आम्ही पाहिले विमान इमारतीच्या दिशेने येत आहे. आम्ही पळू लागलो तेवढ्यात आगीचा गोळा पाहिला. आम्ही घाबरून पळतच होतो. अतुल्य आर्टच्या बिल्डिंगपाठी जाऊन लपलो आणि ब्लास्ट झाला. हा सर्व प्रकार केवळ दहा सेकंदामध्ये झाला. जर, आम्ही बिल्डिंगपाठी लपलो नसतो किंवा पायऱ्यांवर असतो तर आज आम्ही जीवंत नसतो. कारण आम्ही ज्या पायऱ्यांवर होतो तिथेच विमान क्रॅश झाले.

विद्यार्थ्यांचा हा अनुभव मन हेलावून टाकणारा आहे. डॉक्टर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. आपल्या मित्रांच्या आणि अनेक विद्यार्थ्यांच्या जाण्याने बी जे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in