

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता विमानप्रवासावरही दिसू लागला आहे. अकासा एयर (Akasa Air) ने १५ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन अधिभार (Fuel Surcharge) लागू करण्याची घोषणा केली आहे.
याआधी एयर इंडिया (Air India) आणि इंडिगो (IndiGo) या विमान कंपन्यांनीही इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली आहे.
Akasa Air कडून ₹१९९ ते ₹१,३०० पर्यंत फ्युएल सरचार्ज
Akasa Air ने सांगितले की, १५ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर ₹१९९ ते ₹१,३०० पर्यंत फ्युएल सरचार्ज आकारला जाईल. मात्र, १५ मार्चच्या रात्री १२:०१ वाजण्यापूर्वी केलेल्या बुकिंगवर हा अधिभार लागू होणार नाही.
कंपनीच्या माहितीनुसार, हा सरचार्ज प्रत्येक सेक्टरनुसार लागू होईल आणि उड्डाणाच्या कालावधीनुसार त्याची रक्कम वेगळी असेल.
Air India कडून टप्प्याटप्प्याने वाढ
Air India ने यापूर्वीच १२ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर फ्युएल सरचार्ज लागू करण्याची घोषणा केली आहे.
पहिल्या टप्प्यात देशांतर्गत आणि SAARC देशांसाठी ₹३९९ अधिभार तर मध्यपूर्व देशांसाठी $१० इंधन अधिभार वाढवण्यात आला आहे. याशिवाय, दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिका मार्गांवरील अधिभार $४० आणि $६० वरून वाढवून अनुक्रमे $६० आणि $९० करण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यात, १८ मार्चपासून युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मार्गांवरील अधिभार वाढवला जाणार आहे. यामध्ये युरोप $१०० वरून $१२५, उत्तर अमेरिका $१५० वरून $२०० तर ऑस्ट्रेलिया $१५० वरून $२०० इतका इंधन अधिभार असणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया या पूर्व आशियाई बाजारपेठांसाठी अधिभार जाहीर केला जाणार आहे.
IndiGo कडूनही अतिरिक्त शुल्क
IndiGo ने देखील इंधन अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत आणि भारतीय उपखंड मार्ग ₹४२५ अधिभार, मध्यपूर्व मार्ग ₹९०० अधिभार, दक्षिण-पूर्व आशिया, चीन, आफ्रिका आणि पश्चिम आशिया ₹१,८०० अधिभार तर युरोप मार्ग ₹२,३०० अधिभार वाढवण्यात आला आहे.
विमान कंपन्यांच्या मते, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.