
प्रयागराज : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आपल्या कुटुंबासह प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला भेट देत संतांच्या मंत्रोच्चारात त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगगुरू बाबा रामदेव यांनीही त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. यानंतर अमित शहा यांनी कुटुंबासह प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान अनेक संतांच्या उपस्थितीत आरती केली.
सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास अमित शहा हे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वतीच्या संगमावर असलेल्या अरैल येथील व्हीआयपी घाटावर पोहोचले. यावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत जुना पीठाधीश्वर महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरी महाराज आणि काही इतर उच्च संतांसोबत त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. यानंतर अमित शहा यांचे पुत्र आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनीही त्रिवेणी संगम घाटावर पवित्र स्नान केले. यावेळी संतांनी जय शहा याला आशीर्वाद दिले. यानंतर जय शहा यांनी हनुमान मंदिराला भेट दिली.
उत्तर प्रदेश माहिती विभागाच्या मते, २६ जानेवारी २०२५ पर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात भाग घेतला असून ही संख्या वेगाने वाढत आहे. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा प्रयागराजला भेट देणार असून कुंभस्नान करणार आहेत.
गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होते का? -खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मध्य प्रदेशातील महू येथे केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. गंगेत डुबकी मारल्याने दारिद्र्य दूर होते का, अन्न मिळते का, अशी टीका खर्गे यांनी केली. यावर आक्रमक झालेल्या भाजपने याला हिंदूंचा द्वेष म्हटले असून काँग्रेस पक्ष आता नवीन मुस्लीम लीग बनला असल्याची टीका केली आहे. “गंगेत डुबकी मारल्याने दारिद्र्य दूर होते का, पोटाला अन्न मिळते का? मला कोणाच्याही श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करायचे नाही. कुणाला दुखावले गेले असेल तर मी माफी मागतो. पण मला सांगा, जेव्हा मूल उपाशी मरत आहे, मूल शाळेत जात नाही, मजुरांना मजुरी मिळत नाही, तेव्हा हे लोक जाऊन हजारो रुपये खर्च करत आहेत. टीव्हीवर चांगले काही येत नाही तोपर्यंत डुबकी मारत राहतात, असे लोक देशाचे भले करणार नाहीत,” अशा शब्दांत खर्गे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.