

जामनगर : कोलंबियाच्या मॅग्डालेना नदी खोऱ्यात सध्या सुमारे २०० दरियाई घोडे आहेत. १९८० च्या दशकात पहिल्यांदा काही पाणघोडे येथे आणले गेले. या भागात त्यांना कोणी शत्रू नसल्याने आणि अनुकूल वातावरणामुळे त्यांची वाढ झपाट्याने झाली असून त्यामुळे स्थानिक जैवविविधता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ८० प्राण्यांना मारण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यावर आता ‘वनतारा’ने पर्याय सुचवला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक आणि जगातील मोठ्या वन्यजीव बचाव केंद्रांपैकी एक ‘वनतारा’ चे संस्थापक अनंत अंबानी यांनी कोलंबिया सरकारला या प्राण्यांचे प्राण वाचवण्याची विनंती केली आहे. त्यांनी एक मानवी आणि वैज्ञानिक पर्याय सुचवला आहे. या प्राण्यांना सुरक्षितपणे गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या ‘वनतारा’मध्ये आणून त्यांना कायमस्वरूपी निवास देता येऊ शकेल असे म्हटले आहे. पशु कल्याणासाठीच्या त्यांच्या योगदानामुळे त्यांना अलीकडेच ‘ग्लोबल ह्यूमेन अवॉर्ड’ मिळाला असून, हा सन्मान मिळवणारे ते सर्वात तरुण आणि पहिले आशियाई ठरले आहेत.
अनंत अंबानी म्हणाले, “हे ८० दरियाई घोडे संवेदनशील प्राणी आहेत आणि बदलत्या परिस्थितींचा परिणाम त्यांच्यावर होत आहे. जर त्यांना सुरक्षित आणि मानवी पद्धतीने वाचवण्याची क्षमता आपल्याकडे असेल, तर त्यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे.”
वनताराने कोलंबियाच्या अधिकाऱ्यांना एक सविस्तर योजना सादर केली आहे. यामध्ये पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीम, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारखे वातावरण तयार करण्याचा समावेश आहे.
अंबानी पुढे म्हणाले, “करुणा आणि प्राण्यांचे संरक्षण हे एकमेकांच्या विरोधात नाहीत. योग्य वैज्ञानिक दृष्टीकोन आणि नियोजनासह काम केल्यास मानवसमूह आणि निसर्गाचे रक्षण करताना प्राण्यांचेही संरक्षण करता येते. वनताराकडे हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञता आणि सुविधा आहेत.”
वनतारा काय आहे?
गुजरातमधील जामनगर येथे स्थित Vantara हे जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वन्यजीव बचाव, देखभाल आणि संरक्षण केंद्रांपैकी एक आहे. येथे हत्ती, वाघ, सिंह, प्राइमेट्स, सरपटणारे प्राणी आणि इतर सस्तन प्राण्यांसाठी विशेष वैद्यकीय सेवा आणि दीर्घकालीन देखभाल उपलब्ध आहे.