

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरात शनिवारी (दि. १) मोठा अपघात घडला. मंदिरात एकादशीनिमित्त दर्शनासाठी जमलेल्या भाविकांमध्ये भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ९ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर मंदिर परिसरात हाहाकार माजला असून, प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रेलिंग कोसळल्याने उडाला गोंधळ
शनिवारी एकादशी असल्याने श्रीकाकुलम जिल्ह्यातील या प्राचीन वेंकटेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दर्शनासाठी लांबलचक रांगा लागल्या असताना अचानक रेलिंग कोसळल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. काही क्षणांतच तीव्र चेंगराचेंगरी झाली आणि अनेकजण त्यात सापडले. स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.
“उत्तरेचा तिरुपती” म्हणून ओळखले जाणारे प्राचीन मंदिर
काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिर हे आंध्र प्रदेशातील एक सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ मानले जाते. ११व्या-१२व्या शतकात चोल आणि चालुक्य राजवटीच्या काळात बांधले गेलेले हे मंदिर 'उत्तरेचा तिरुपती' म्हणून ओळखले जाते. वर्षभर या ठिकाणी भक्तांची मोठी वर्दळ असते, मात्र एकादशीसारख्या धार्मिक उत्सवांच्या काळात हजारो लोक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
मंत्री घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती मिळताच राज्याचे कृषी मंत्री के. अचन्नायडू तातडीने मंदिरात पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना मदतकार्य गतीमान करण्याच्या आणि गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्दैवी घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले, “श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींना तत्काळ आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.”
नायडूंनी स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्वरित मदत, वैद्यकीय सेवा आणि गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
घटनेचे थरारक दृश्य व्हायरल
तेथे उपस्थितांनी या घटनेचे व्हिडिओ काढले आहेत. या व्हिडिओमध्ये चेंगराचेंगरीमध्ये झालेली लोकांची दुर्दशा दिसून येत आहे. अनेकजण मदतीसाठी याचना करताना दिसत आहेत. तर, काही जण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रशासनाची प्राथमिक चौकशी सुरू
स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनेची प्राथमिक चौकशी सुरू केली असून, रेलिंगच्या कोसळण्यामागील कारण, तसेच गर्दी व्यवस्थापनात झालेल्या त्रुटींचा शोध घेतला जात आहे. घटनेचा सविस्तर अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.