आंध्र प्रदेशात ONGC च्या तेलविहिरीत गॅसगळती; परिसरात भीतीचे वातावरण, ३ गावांना सतर्कतेचा इशारा

आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील इरुसुमंदा गावात ONGC च्या कार्यरत तेलविहिरीत दुरुस्ती दरम्यान मोठी गॅसगळती व आग लागल्याची घटना घडली. गॅस-धुराचे लोट पसरल्याने...
आंध्र प्रदेशात ONGC च्या तेलविहिरीत गॅसगळती; परिसरात भीतीचे वातावरण, ३ गावांना सतर्कतेचा इशारा
Published on

आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील इरुसुमंदा गावात कार्यरत असलेल्या ओएनजीसी (ONGC) च्या तेलविहिरीतून सोमवारी (दि.५) मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजोल तालुक्यातील या तेलविहिरीवर दुरुस्तीचे काम सुरू असताना ही गंभीर घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन तात्पुरते थांबवलेल्या विहिरीवर ‘वर्कओव्हर रिग’च्या साहाय्याने दुरुस्ती सुरू होती. तेव्हा वायुगळती झाली आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूसोबत कच्चे तेल हवेत उंच उडाले. काही वेळातच या गॅसला आग लागली आणि विहिरीच्या ठिकाणी ज्वाळा भडकल्या.

तीन गावांना सतर्कतेचा इशारा; वीज व गॅस वापरावर बंदी

वायू गळतीमुळे इरुसुमंदा आणि आजूबाजूच्या भागात दाट धुराचे व गॅसचे लोट पसरले. संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने लाऊडस्पीकरद्वारे जवळच्या तीन गावांतील नागरिकांना वीज उपकरणे न वापरण्याचे आणि स्वयंपाकासाठी गॅस किंवा चुल न पेटवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

गावकऱ्यांचे स्थलांतर; जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवले

परिस्थिती गंभीर होत असल्याने पंचायत अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. अनेक गावकऱ्यांनी आपली घरे सोडून जनावरेही सुरक्षित ठिकाणी हलवली.

ONGC व प्रशासन घटनास्थळी; परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न

गळती आटोक्यात आणण्यासाठी ONGC चे तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसर सील करण्यात आला असून, वरिष्ठ जिल्हाधिकारी आणि ONGC चे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आग व गॅसगळती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना सुरू आहेत.

ONGC चे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी

आंध्र प्रदेशातील मोरी क्षेत्रातील (Mori Field) ONGC च्या मोरी #5 (Mori#5) तेलविहिरीत झालेल्या गॅसगळतीबाबत ONGC ने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ONGC च्या माहितीनुसार, वर्कओव्हर ऑपरेशन्सदरम्यान गॅसगळती झाल्याची माहिती PEC ऑपरेटर डीप इंडस्ट्रीज लिमिटेड (Deep Industries Limited) यांच्याकडून देण्यात आली. ही विहीर दुर्गम भागात असून, सुमारे ५०० ते ६०० मीटरच्या परिसरात कोणतीही मानवी वस्ती नाही, असे ONGC ने स्पष्ट केले आहे.

कोणतीही जीवितहानी नाही; परिसर सुरक्षित

ONGC च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर सील (cordon off) करण्यात आला असून, कूलिंग ऑपरेशन्स तातडीने सुरू करण्यात आली आहेत.

आंध्र प्रदेशातील ONGC चे महत्त्वपूर्ण कार्यक्षेत्र

ONGC चे आंध्र प्रदेशातील कृष्णा–गोदावरी डेल्टा परिसरात मोठे कार्यक्षेत्र आहे. राजामुंद्री ऑनशोअर अॅसेट आणि ईस्टर्न ऑफशोअर अॅसेटच्या माध्यमातून कंपनी नैसर्गिक वायू, कच्चे तेल आणि इतर हायड्रोकार्बन्सचे उत्पादन करते. बे ऑफ बंगालमधील ऑफशोअर प्लॅटफॉर्मवरून मिळणारे हायड्रोकार्बन्स पाइपलाइनद्वारे यानम (पुदुच्चेरी) आणि मल्लवरम (आंध्र प्रदेश) येथील प्रक्रिया केंद्रांपर्यंत नेले जातात.

logo
marathi.freepressjournal.in