ज्योती मल्होत्राच्या संपर्कात आणखी एक युट्यूबर? प्रियंका सेनापतीसोबतच्या कनेक्शनचा ओडिशा पोलिसांकडून तपास सुरू

सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योती मल्होत्रा हिला भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ती पहलगाम हल्ल्याआधी पाकिस्तानमध्ये होती, ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता ओडिशामधील युट्यूबर प्रियंका सेनापती हिचेही नाव संशयित म्हणून पुढे आले आहे.
ज्योती मल्होत्राच्या संपर्कात आणखी एक युट्यूबर? प्रियंका सेनापतीसोबतच्या कनेक्शनचा ओडिशा पोलिसांकडून तपास सुरू
Published on

सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योती मल्होत्रा हिला भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ती पहलगाम हल्ल्याआधी पाकिस्तानमध्ये होती, ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता ओडिशामधील युट्यूबर प्रियंका सेनापती हिचेही नाव संशयित म्हणून पुढे आले असून, ओडिशा पोलिस याप्रकरणी सक्रिय झाले आहेत. ज्योती आणि प्रियंका यांच्या संबंधांची चौकशी सुरू आहे.

ओडिशातील भेटी आणि संशय

ओडिशा सीआयडी गुन्हे शाखेचे पोलिस महानिरीक्षक सार्थक सारंगी यांनी सांगितले की, “ज्योती मल्होत्राने पुरीतील श्रीजगन्नाथ मंदिर तसेच चिल्का आणि कोणार्क येथे भेट दिली होती. या भेटींचे व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यावेळी ती ओडिशातील युट्यूबर प्रियंका सेनापती हिच्या संपर्कात होती. आम्ही सर्व तथ्यांची पडताळणी करत आहोत.”

प्रियंका सेनापती ही ओडिशा येथील रहिवासी असून काही महिन्यांपूर्वी तिने करतारपूर कॉरिडॉरला भेट दिली होती. 'Prii_vlogs' नावाच्या तिच्या युट्यूब चॅनलवर ‘ओडिया गर्ल इन पाकिस्तान’ या शीर्षकाने तिने हा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्याला हजारो व्ह्यूज मिळाले. सप्टेंबर २०२४ मध्ये जेव्हा ज्योती पुरीला आली होती, तेव्हा प्रियंका तिला जगन्नाथ मंदिरात घेऊन गेली होती. या दोघींच्या व्हिडिओंमध्ये पाकिस्तान हा समान धागा असल्याने त्यांच्यातील संबंधांचा तपास सुरू आहे.

तपास अजूनही सुरू

पुरीचे एसपी विनीत अग्रवाल यांनी स्पष्ट केलं की, “हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे. आम्ही प्रत्येक वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत. प्रियंका सेनापतीची नेमकी भूमिका काय आहे, हे ठरवण्यासाठी अजून तपास सुरू आहे. हरियाणा पोलिस आणि केंद्रीय एजन्सींच्या समन्वयाने ही चौकशी केली जात आहे.”

पाकिस्तान दौरे आणि हेरगिरीचा संशय

हिसारचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, ज्योती मल्होत्रा अनेक युट्यूब इन्फ्लुएन्सर्सच्या संपर्कात होती आणि हे सर्वजण Pakistan Information Officers (PIOs) च्या संपर्कात होते. ती प्रायोजित सहलींसाठी पाकिस्तानमध्ये जात होती. पहलगाम हल्ल्यापूर्वी तिचा पाकिस्तान दौरा झाला होता. त्याचा आणि हल्ल्याचा काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील भेट

प्राथमिक चौकशीत ज्योतीने २०२३ मध्ये व्हिसासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात भेट दिल्याचे स्पष्ट केले आहे. तेथे तिची ओळख अहसान-उर-रहीम उर्फ ‘दानिश’ या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी झाली. नंतर त्या दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला आणि ती दोन वेळा पाकिस्तानला गेली. तिच्या प्रवासाची आणि निवासाची व्यवस्था अहसान-उर-रहीमने केली होती. पाकिस्तान दौऱ्यात तिने गुप्तचर अधिकाऱ्यांशीही बैठक घेतल्याचा गंभीर आरोप आहे.

डिव्हाइस झडतीत संशयास्पद माहिती

हिसारचे डीएसपी कमलजीत यांनी सांगितले की, “ज्योतीला 'अधिकृत गुप्तता अधिनियम' तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असून, त्यामधून संशयास्पद माहिती आढळली आहे. सध्या ती पाच दिवसांच्या रिमांडवर असून, तपास सुरू आहे.”

ज्योतीच्या वडिलांची प्रतिक्रिया -

ज्योतीचे वडील हरिस मल्होत्रा यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली, की मला काहीच माहित नव्हते. तिने मला सांगितले होते, की ती दिल्लीला जाणार आहे. तिने मला कधीही काहीही सांगितले नाही. तिचे कोणीही मित्र आमच्या घरी आले नाहीत... काल पोलिसांनी तिला इथे आणले, ती तिचे कपडे घेऊन निघून गेली, तिने मला काहीही सांगितले नाही... ती घरी व्हिडिओ बनवायची. या पलीकडे मला काही माहीत नाही. माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत, जे व्हायचे ते होईल."

logo
marathi.freepressjournal.in