Goa Nightclub Fire : आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना धीर; सरकारकडून मदतीचे आश्वासन

उत्तर गोव्यातील अर्पोरा भागात असणाऱ्या बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane) या नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. आगीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

शनिवारी (दि.६) उत्तर गोव्यातील अर्पोरा भागात असणाऱ्या बर्च बाय रोमिओ लेन (Birch by Romeo Lane) या नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये आग लागण्याच्या काही सेकंदाआधीचा थरारक क्षण स्पष्टपणे कैद झाला आहे. भीषण आगीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी म्हणाले, "गोव्यातील अर्पोरा येथे झालेली आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी मी प्रार्थना करतो."

पुढे ते म्हणाले, "या परिस्थितीबाबत मी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधला आहे. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे."

आवश्यक अग्निसुरक्षा नियमांचे पालन नाही

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, "मृतांमध्ये बहुतांश किचन स्टाफ होते, त्यात तीन महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत तीन ते चार पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात या नाईटक्लबने आवश्यक अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन करून क्लब सुरू ठेवण्यास परवानगी देणाऱ्या व्यवस्थापनावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगीचा थरार कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओमध्ये एका मंचावर बेली डान्सर नृत्य करताना दिसते. साधारण दहा सेकंदांनंतर वरच्या छतामधून अचानक आग उसळताना दिसून येतेय. अवघ्या एक-दोन सेकंदांतच आग संपूर्ण छतावर पसरते.

आगीचे प्रमाण वाढताच महिला डान्सर आणि अन्य कर्मचारी घाबरून पळतात. व्हिडीओत क्लबमध्ये दाटलेला धूर पाहायला मिळतोय.

logo
marathi.freepressjournal.in