

आसामच्या जोरहाट जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मुलाचा परीक्षेचा निकाल घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव दिपांकर बोरदोलोई असून ते ३५ वर्षांचे होते.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतून निकाल घेतल्यानंतर बाहेर पडत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते तिथेच जमिनीवर कोसळले. खाली पडल्यानंतर शाळेतील शिक्षक आणि उपस्थित पालकांनी तातडीने त्यांना जवळच्या जोरहाट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (JMCH) येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना जोरहाटमधील सॅमफोर्ड स्कूलमध्ये घडली. दिपांकर बोरदोलोई हे त्यांच्या मुलाचा परीक्षेचा निकाल घेण्यासाठी शाळेत आले होते. त्यांचा मुलगा यूकेजी (UKG) वर्गात शिकत आहे. दिपांकर बोरदोलोई हे जोरहाटमधील सोनारी गावचे रहिवासी होते. ते आसाम सरकारच्या सिंचन विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते.
सडन कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू
डॉक्टरांच्या माहितीनुसार, दिपांकर बोरदोलोई यांचा मृत्यू सडन कार्डियक अरेस्टमुळे झाला. हा झटका अनेकदा कोणतेही संकेत न देता अचानक येतो आणि काही सेकंदांत व्यक्ती बेशुद्ध पडते. वेळेत सीपीआर मिळाल्यास काही वेळा जीव वाचू शकतो, मात्र अनेक प्रकरणांमध्ये तो प्राणघातक ठरतो.
शालेय परिसरात शोककळा
या घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक सर्वच गहिवरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह सहकाऱ्यांमध्येही शोककळा पसरली आहे.