आसाम : सैरांग- नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसची धडक बसल्याने आसामच्या होजाई जिल्ह्यात शनिवारी (दि. २०) पहाटे हत्तींच्या कळपातील ७ हत्ती ठार झाले असून १ हत्ती गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात ट्रेनचे पाच डबे आणि इंजिन रुळावरून घसरले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
होजाई जिल्ह्यात पहाटे घडला भीषण अपघात
ही घटना शनिवारी पहाटे सुमारे २.१७ वाजता होजाई जिल्ह्यातील छंगजुराई गावाजवळ घडली. सुरुवातीला आठही हत्ती मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले होते; मात्र नंतर त्यापैकी एक हत्ती जिवंत आढळून आल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
दाट धुक्यामुळे दुर्घटनेचा संशय
'द हिंदू'च्या वृत्तानुसार नागाव विभागाचे वन अधिकारी सुहास कदम यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, परिसरात दाट धुके असल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. “मृत्यूमुखी पडलेल्या सातही हत्तींचे शवविच्छेदन सुरू आहे. जखमी हत्तीवर स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अपघातस्थळाजवळच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,” असे त्यांनी सांगितले.
उत्तर-पूर्व सीमांत रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितले की, हा अपघात लुमडिंग विभागातील जामुनामुख-कांपूर रेल्वे मार्गावर झाला. हे ठिकाण गुवाहाटीपासून सुमारे १२६ किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा परिसर अधिकृत हत्ती मार्ग (एलिफंट कॉरिडॉर) म्हणून घोषित केलेला नाही. "ट्रेनच्या लोको पायलटला हत्तींचा कळप दिसताच आपत्कालीन ब्रेक लावण्यात आले; मात्र हत्ती थेट ट्रेनवर आदळल्याने ही दुर्घटना घडली,” असे शर्मा यांनी सांगितले.
अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू
अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दुर्घटना निवारणासाठी विशेष रिलीफ ट्रेन घटनास्थळी दाखल झाली असून, विभागीय मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले. उत्तर-पूर्व सीमांत रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच लुमडिंगचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.
प्रवाशांसाठी हेल्पलाईन सुरू
प्रवाशांच्या सोयीसाठी गुवाहाटी रेल्वे स्थानकावर हेल्पलाईन क्रमांक - ०३६१-२७३१६२१ / २७३१६२२ / २७३१६२३ - सुरू करण्यात आले आहेत. अपघातग्रस्त डब्यांमधील प्रवाशांना तात्पुरत्या स्वरूपात इतर डब्यात हलवण्यात आले. अपघातग्रस्त डबे वेगळे करून ही ट्रेन सकाळी ६.११ वाजता गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाली.
गुवाहाटी येथे ट्रेनमध्ये अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असून, त्यानंतर ही राजधानी एक्सप्रेस पुढील प्रवास सुरू करणार आहे. दरम्यान या अपघातानंतर काही कालावधीसाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. काही रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले होते.