अयोध्येतील राम मंदिराचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार; १,९०० कोटी रुपये एकूण खर्च

अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित सर्व बांधकामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे एकूण खर्च सुमारे १,९०० कोटी रुपये असल्याची माहिती राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी शनिवारी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित सर्व बांधकामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे एकूण खर्च सुमारे १,९०० कोटी रुपये असल्याची माहिती राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी शनिवारी दिली.

येथील राम मंदिर बांधकाम समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीचा समारोप झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मिश्र म्हणाले की, या प्रकल्पातील महत्त्वाची कामे करणाऱ्या लार्सन ॲण्ड टुब्रो (एल ॲॅण्ड टी) आणि टाटा कन्सल्टन्सी या कंपन्या बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत मंदिर संकुलातून माघार घेतील.

मिश्र यांनी पुढे सांगितले की, याच तारखेपर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता आणि बिलांच्या देयकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दोन्ही कंपन्यांनी त्यांनी केलेल्या सर्व कामांसाठी तीन वर्षांची हमी दिली आहे. देखभाल व व्यवस्थापनासाठी दोन्ही कंपन्यांची एक छोटी टीम मंदिर संकुलात कार्यरत राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, ३० एप्रिलनंतर एल ॲण्ड टी, टाटा कन्सल्टन्सी आणि राज्य बांधकाम महामंडळाशी असलेले सर्व करार श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे वर्ग केले जातील.

खर्चाचा तपशील देताना मिश्र यांनी सांगितले की, राम मंदिर प्रकल्पावरील एकूण खर्च सुमारे १,९०० कोटी रुपयांचा असून, त्यापैकी सुमारे १,६०० कोटी रुपये (जीएसटीसह) आतापर्यंत अदा केले आहेत. या बैठकीत बांधकाम व संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच कामे पूर्ण करण्यासाठी अंतिम कालमर्यादा आणि जबाबदाऱ्यांच्या हस्तांतरणाबाबत चर्चा करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in