अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर आज (दि.२५) भगव्या रंगाचा धर्मध्वज दिमाखात फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजन करून ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. या ध्वजारोहण सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजवण्यात आली होती. ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हा संदेश धर्मध्वज देत राहील, अशा भावना व्यक्त केल्या.
अयोध्येच्या राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूट उंच स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद धर्मध्वज फडकवण्यात आला. या धर्मध्वजावर कोविदार वृक्ष आणि तेजस्वी सूर्याची प्रतिमा असून, मंत्रोच्चार आणि जयघोषांच्या वातावरणात हा ध्वज मंदिराच्या कळसावर स्थिरावला. हजारो भाविकांनी अयोध्येत उपस्थित राहून हा सोहळा अनुभवला.
ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “नेहमी सत्याचाच विजय होतो. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हा संदेश हा धर्मध्वज देत राहील. भेदभाव आणि गरीबी नसलेल्या समाजाची ही प्रेरणा आहे. अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्श आचरणात रूपांतरित होतात.अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्री रामजन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण करणे हा माझ्यासाठी एक अतिशय भावनिक अनुभव आहे. शुभ मुहूर्तावर पार पडलेला हा विधी आपल्या सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेतील एका नवीन अध्यायाचा शुभारंभ करतो."
पुढे ते म्हणाले, "आपण एक चैतन्यशील समाजाचे घटक आहोत. आपण दूरदृष्टीने काम केले पाहिजे. आपण येणारी दशके, येणारी शतके लक्षात ठेवली पाहिजेत. राम मंदिराचा गौरवशाली ध्वज विकसित भारताचा पाया आहे. भगवान श्री रामांचा हा धर्मध्वज एक साधारण ध्वज नाही. हा भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा आहे. हा ध्वज धोरण आणि न्यायाचे प्रतीक असू दे, हा ध्वज सुशासनाद्वारे समृद्धीचा मार्गदर्शक असू दे आणि हा ध्वज सदैव याच स्वरूपात फडकत राहो, विकसित भारताची ऊर्जा बनो... हीच माझी भगवान श्री रामाकडे इच्छा आहे", असे मोदींनी म्हटले.
धर्मध्वजाची वैशिष्ट्ये
केशरी रंग, ११ फूट रुंद, २२ फूट लांब
मंदिराच्या १६१ फूट शिखरावर ४२ फूट उंचीचा ध्वज
जमिनीपासून एकूण १९१ फूट उंचीवर फडकणारा ध्वज
विशेष यंत्रणेद्वारे बटण दाबताच ध्वज दोरीवरून वर जाऊन कळसावर स्थिरावतो.
राम मंदिरात फडकवलेला ध्वज अहमदाबादमधील कारागिरांनी बनवला असून हा ध्वज एका खास नायलॉन पॅराशूट फॅब्रिकपासून बनवला आहे.
या ध्वजाला ऊन, वारा, पाऊस यापासून काहीही नुकसान होणार नाही.
हा ध्वज उंच ठिकाणी असल्याने तो अयोध्येत पोहोचल्यानंतर दूरवरून दिसेल.