चपलीच्या नादात गमावला जीव; वाहत्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पारेवा खोल या लोकप्रिय पर्यटनस्थळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. शनिवारी (२० जुलै) पिकनिकसाठी गेलेल्या २० वर्षीय आयुष यादव या युवकाचा वाहत्या नदीत बुडून मृत्यू झाला. SDRF च्या पथकाने तब्बल २४ तासांच्या शोधमोहीमेनंतर रविवारी (२१ जुलै) दुपारी त्याचा मृतदेह बाहेर काढला.
चपलीच्या नादात गमावला जीव; वाहत्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
Published on

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पारेवा खोल या लोकप्रिय पर्यटनस्थळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. शनिवारी (२० जुलै) पिकनिकसाठी गेलेल्या २० वर्षीय आयुष यादव या युवकाचा वाहत्या नदीत बुडून मृत्यू झाला. SDRF च्या पथकाने तब्बल २४ तासांच्या शोधमोहीमेनंतर रविवारी (२१ जुलै) दुपारी त्याचा मृतदेह बाहेर काढला.

चप्पलमुळे ओढवली दुर्दैवी घटना -

लखनादौन येथील रहिवासी असलेला आयुष यादव शनिवारी आपल्या पाच मित्रांसोबत पारेवा खोल येथे पिकनिकसाठी गेला होता. नदीकिनारी असताना त्याच्या पायातील चप्पल पाण्यात गेली. ती परत मिळवण्यासाठी त्याने एका लाकडी काठीचा वापर केला आणि जवळपास यशस्वीही झाला. मात्र, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने चप्पल पुढे जात राहिली.

चप्पल पकडण्याच्या प्रयत्नात आयुष अधिक वाकला आणि पाय घसरल्याने तो थेट नदीत पडला. काही क्षणांतच तो प्रवाहात वाहून गेला.

मित्रांनी दिली प्रशासनाला माहिती -

घटनेनंतर त्याच्या मित्रांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली. SDRF (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) चं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि शोधकार्य सुरू केलं. अखेर रविवारी दुपारी त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आलं.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -

या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांनी शूट केला होता. तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आयुष काठीच्या साहाय्याने चप्पल काढण्याचा प्रयत्न करताना आणि नंतर अचानक नदीत पडून वाहून जाताना दिसतो. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त केली आहे.

पर्यटनस्थळी सावधगिरी गरजेची -

पारेवा खोल हे सिवनी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलं, तरी पावसाळ्यात येथे नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असतो. त्यामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी जास्तीत जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. क्षुल्लक चुकीमुळेही जीव गमवावा लागू शकतो, हे या घटनेतून स्पष्ट होते.

logo
marathi.freepressjournal.in