
उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार उघड झाला आहे. बरेली शहरात एका कार चालकाने वाहतूक नियम मोडताना थेट एका होमगार्डला गाडीच्या बोनेटवर चढवून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय घडलं नेमकं?
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौपाला पुलाजवळ ही घटना घडली. बरेलीमध्ये सुरु असलेल्या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण कठोर करण्यात आलं होतं. याच दरम्यान एक कार एकेरी मार्गात घुसण्याचा प्रयत्न करत होती. ड्युटीवर असलेल्या होमगार्डने कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने थांबण्याऐवजी वेग वाढवला.
आपला जीव वाचवण्यासाठी होमगार्ड गाडीच्या बोनेटवर चढला, मात्र चालकाने गाडी न थांबवता चौपाला पुलापासून मिशन कंपाउंडपर्यंत सुमारे ५ किमीपर्यंत गाडी वेगाने चालवली. हे संपूर्ण दृश्य व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येत आहे.
पळ काढताना पोलिसांच्या गाडीला धडक -
मिशन कंपाउंडजवळ पोहोचल्यावर, आरोपीने होमगार्डला रस्त्यावर फेकलं आणि घटनास्थळावरून पळून गेला. पळताना त्याने वाहतूक उपनिरीक्षकांच्या सरकारी गाडीला धडक दिली.
पोलिसांची कारवाई सुरू
सुदैवाने, होमगार्डला गंभीर दुखापत झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी गाडीचा नंबर ओळखून आरोपीचा शोध सुरू केला आहे. एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे.
“चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच त्याला अटक केली जाईल,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.