
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील हरयाणा भवन येथे मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा करत त्यांच्या समस्या आणि विचार ऐकून घेतले. अडीच तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीला ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख उमर अहमद इलियासी यांच्यासह अनेक मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते.
दोन्ही समुदायांमधील गैरसमज दूर करून सलोखा आणि संवाद वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या बैठकीमुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये संवाद वाढवण्याच्या रा. स्व. संघाच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा गती मिळाली आहे. या बैठकीत हिंदू-मुस्लिम यांच्यात एकता आणि शांतता कशी निर्माण करावी, यावर चर्चा झाली. यासोबतच समाजाला विभाजित करणाऱ्या घटकांना संपवण्यावरही चर्चा झाली.
या उच्चस्तरीय बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे, सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, वरिष्ठ नेते राम लाल आणि इंद्रेश कुमार यांच्यासह ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख उमर अहमद इलियासी यांच्यासह देशभरातील ७० हून अधिक प्रतिष्ठित मुस्लिम धर्मगुरू, विचारवंत आणि मौलाना उपस्थित होते.
या बैठकीचा मुख्य अजेंडा म्हणजे इमामांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवणे. भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवर मार्गदर्शन करणे. आंतर-धार्मिक संवाद आणि शांतता निर्माण करण्यासाठी योगदान देणे आणि सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी काम करणे हा होता. समाजातील सलोखा, परस्पर समज, सामाजिक ऐक्य वाढवणे, एकमेकांविषयीचा संवाद मजबूत करणे आणि गैरसमज दूर करणे या प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते.