इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील पाच वर्षांच्या मीडिया प्रसारण हक्कांसाठी मुंबईतील बड्या कंपन्यांमध्ये रविवारी सुरू झालेली बोली सोमवारपर्यंत चालणार आहे. प्रत्येक सामन्याच्या हक्कांसाठी (टीव्ही+डिजिटल) बोली १०० कोटींच्या पुढे गेल्याचे वृत्त समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येक सामन्याच्या हक्काची मूळ किंमत ४९ कोटी रुपये निश्चित केली होती; परंतु डिजिटल आणि ब्रॉडकास्टिंग मीडिया हक्कांसाठीची बोलीची किंमत ४० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या वेळी मिळालेल्या रकमेच्या दुपटीहून ही अधिक बोली लागल्याचे स्पष्ट होत आहे.
बीसीसीआयला २०१८-२२पर्यंतच्या मीडिया हक्कांमधून १६ हजार ३४७ कोटी रुपये मिळाले होते. यावेळी बीसीसीआयने चार गटांचा समावेश करून बोलीची मूळ किंमत ३२ हजार ८९० कोटी रुपये निश्चित केली आहे. दरम्यान, बीसीसीआय’कडून आयपीएलमधील लढती वाढविण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. नव्या योजनेनुसार पहिल्या दोन वर्षी ७४ लढती खेळवण्यात येतील, असे कळते. त्यानंतरच्या आयपीएल मोसमांत ८४ ते ९४ लढती खेळवण्याचा विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. स्टार इंडिया, झी एंटरटेन्मेट इंटरप्रायझेस, रिलायन्स वायाकॉम, सोनी ग्रुप, ड्रीम इलेव्हन, ॲपेल इन्क, सुपरस्पोर्ट (दक्षिण आफ्रिका) या कंपन्या मीडिया हक्कांच्या शर्यतीत आहेत.