मैत्रीचं नातं हे इतर नात्यांपेक्षा खास असतं. आपल्या जिवलग मित्रांसाठी अनेकजण आपल्या प्राणाची सुद्धा पर्वा करत नाहीत. मात्र बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका मित्राने केवळ ५ रुपयांच्या कुरकुरेसाठी त्याच्या जिवलग मित्राची चाकू खुपसून हत्या केली असल्याचे समोर आले. मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी बिहार पोलिसांनी या हत्येमागील कारणाचा खुलासा केला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
सदर घटना ही बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली. रविवार ४ ऑगस्टच्या रात्री ऑफिसर कॉलोनीजवळ सावन कुमार उर्फ अश्विनी कुमार सोनीची चाकू खुपसून हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सोमवारी पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला. मंगळवारी पोलिसांनी या हत्येच्या कारणाचा खुलासा करत ही हत्या केवळ ५ रुपयांचे कुरकुरे खाण्यावरून झाली असं सांगितलं. हत्या करणारा आरोपी कृतिमान कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गोपालगंजचे पोलीस पदाधिकारी प्रांजल त्रिपाठी यांनी सांगितले की, सावन कुमार रविवारच्या रात्री त्याचा मित्र कृतिमानकडे गेला होता. कृतिमानने पाच रुपयांचे कुरकुरे खरेदी करण्यासाठी मित्र सावन याला २० रुपये दिले होते. मात्र सावनने ते कुरकुरे रस्त्यातून येतानाच संपवले. जेव्हा तो कृतिमानकडे पोहोचला तेव्हा त्या दोघांमध्ये कुरकुरे खाल्ल्यामुळे भांडण झाले. तेव्हा इतर मित्रांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण सोडवले. यानंतर काहीवेळाने सावन स्वतःच्या घरी पोहोचला. त्यानंतर कृतिमानने फोन करून सावनला ऑफिसर कॉलोनीजवळ बोलावले. सावन आल्यावर कृतिमानने त्याच्यावर चाकूने वार केले, त्यामुळे सावनचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी सावनची हत्या ज्या चाकूने झाली तो चाकू हस्तगत केला असून आरोपीने हत्या करताना घातलेला काळ्या रंगाचा शर्ट सुद्धा ताब्यात घेतला आहे. हत्या करताना त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग होते हे डाग आरोपीने नंतर मिटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मते हस्तगत केलेलं पुरावे आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरतील.