होमगार्ड परीक्षेदरम्यान तरुणी पडली बेशुद्ध; नराधमांनी केला चालत्या रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार

बिहारच्या बोधगया येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. होमगार्ड पदासाठी परीक्षा देण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीवर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
होमगार्ड परीक्षेदरम्यान तरुणी पडली बेशुद्ध; नराधमांनी केला चालत्या रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार
Published on

बिहारच्या बोधगया येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. होमगार्ड पदाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीवर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या जबाबानुसार, रुग्णवाहिकेत किमान तीन ते चार जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

काय घडलं नेमकं?

शुक्रवारी इमामगंज पोलीस स्टेशन परिसरात होमगार्ड भरती प्रक्रियेदरम्यान संबंधित तरुणीची शारीरिक चाचणी सुरू होती. चाचणी दरम्यान तिची प्रकृती अचानक खालावली आणि ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या प्रवासात तीन ते चार जणांनी तिच्यावर रुग्णवाहिकेत बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

या प्रकरणात रुग्णवाहिकेचा चालक विनय कुमार आणि तंत्रज्ञ अजित कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोन ते तीन आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

घटनेनंतर पीडितेला मगध मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. बोधगया पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) करत आहे.

बोधगया पोलिस संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, घटना घडली त्यावेळी रुग्णवाहिकेत उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा तपशील गोळा केला जात आहे.

दोषींना कोणतीही सूट देणार नाही

गया जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आनंद कुमार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. तपास जलद गतीने सुरू असून, अन्य आरोपी लवकरच गजाआड जातील.”

logo
marathi.freepressjournal.in