Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

बिहारच्या जमुईमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील मुख्य आरोपी नंदन यादव पोलीस चकमकीत जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे.
Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी
Published on

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर बिहारमधील एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलगा आणि मुलीला काही तरुणांनी अडवल्याचे, त्यांना त्रास दिल्याचे आणि मुलीशी गैरवर्तन केल्याचे दिसत असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असतानाच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी नंदन यादव पोलिस कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत जखमी झाला असून त्याच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. त्याच्यावर जमुई सदर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.

१९ सप्टेंबरच्या संध्याकाळी नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे ७ वाजता जमुईतील मडवा हिल परिसरात घडली. दोन्ही विद्यार्थी दहावीमध्ये शिकत असून ते शिकवणीनंतर या परिसरात गेले होते. परतत असताना काही तरुणांनी त्यांना अडवले. यानंतर दोघांनाही त्रास दिला. विशेषतः मुलीशी गैरवर्तन आणि छेडछाड केली. घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या काही जणांनी या प्रकाराचे व्हिडीओही शूट केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही तरुण दोन्ही विद्यार्थ्यांना घेरताना दिसतात. यातील एक आरोपी मुलीला मागून पकडतो आणि तिला जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. मुलीसोबत असलेला विद्यार्थी तिला सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतरही आरोपी त्यांना त्रास देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

या व्हिडीओमुळे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

'टाइम्स इंडिया'च्या वृत्तानुसार, या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी तीन आरोपींचे वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान असून उर्वरित तीन जण अल्पवयीन आहेत.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली रामाशिष चौधरी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडीओच्या आधारे इतर आरोपींचीही ओळख पटवण्यात आली.

लाल स्कार्फमधील तरुण मुख्य आरोपी?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल व्हिडीओमध्ये लाल रंगाचा स्कार्फ घातलेला तरुण नंदन यादव आहे. त्याच्यावर मुलीला पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तो फरार होता आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.

पकडताना पळण्याचा प्रयत्न; पायाला लागली गोळी

पोलिसांना नंदन यादव मडवा हिल परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी परिसराला वेढा घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी नंदनने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

याचदरम्यान पोलिस आणि आरोपीमध्ये चकमक झाली. या चकमकीत नंदन यादवच्या डाव्या पायाला गोळी लागली. त्याला तातडीने जमुई सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणातील सर्व आरोपींची भूमिका तपासली जात असून पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in