
भारतीय संस्कृतीमध्ये साप हा पूजनीय असला तरी त्याला पाहताच आपली पळता भुई थोडी होते. पण, एका व्हायरल व्हिडिओमध्ये अनेकजण छातीत धडकी भरवणाऱ्या सापांना चक्क अंगा-खांद्यावर घेऊन मिरवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आहे बिहारमधला.
अजब गजब बिहारमध्ये अशीही दहशतीला जागा नाही, त्यात साप काय चीज आहे? तर, या बिहारमध्ये साजरा होणारा 'सर्प उत्सव' सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्याच्या सिंघिया गावात दरवर्षी नागपंचमीला हा उत्सव साजरा होतो. पण, त्याचे व्हिडिओ थक्क करणारे आहेत.
सापासोबत साहसी खेळ -
व्हिडिओमध्ये दिसतं की, अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत तर महिलांपासून तरुण मुलींपर्यंत सर्वजण सापांना निर्भयपणे हाताळत आहेत. काही भक्त साप गळ्यात, हातात तर काही जण मुखात धरून विविध साहसी खेळ करताना दिसत आहेत.
खरं तर सापाला पाहून सर्वच जण घाबरतात. पण, बिहारमध्ये सापांचा मोठा उत्सव साजरा केला जातो. हा सर्प उत्सव मिथिला संस्कृतीचा भाग मानला जातो. तसेच, हा उत्सव शंभर वर्षांहून अधिक जुना असल्याचे सांगितले जाते. या उत्सवात पुरुषांसोबत महिलांचाही मोठा सहभाग दिसून येतो. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी नागाची पूजा केली जाते.
सिंघिया बाजारातील भगवती देवी मंदिरातून सर्प उत्सवाला प्रारंभ होतो. सर्व सापांना एकत्र करून देवीसमोर नेलं जातं आणि त्यांना दुधाने स्नान घालून देवीचं दर्शन घडवण्यात येतं. पूजेनंतर भाविक बूढी गंडक नदीच्या घाटावर स्नान करण्यासाठी जातात. मंदिरापासून भाविक घाटापर्यंत 'जय विषहरी माता’च्या जयघोषात साप घेऊन चालताना दिसतात. पुढे घाटावर सामूहिक सर्पपूजा करून उत्सवाची सांगता केली जाते. सर्पपूजनानंतर या सर्व सापांना निसर्गात मुक्त सोडले जाते. या उत्सवाचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.