उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील भाजप नेत्याला एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत गावकऱ्यांनी पकडले. या नेत्याचे नाव राहुल वाल्मिकी असून तो भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा मंत्री आहे. त्याचा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना स्मशानभूमीत घडल्याने गावकऱ्यांच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी भाजपने तातडीने मोठी कारवाई केली आहे.
स्मशानभूमीत आक्षेपार्ह कृत्य -
ही घटना बुलंदशहरच्या सलेमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कैलावन गावातील स्मशानभूमीत घडली. ग्रामस्थांच्या लक्षात आले, की एक कार बराच वेळ स्मशानात पार्क केलेली आहे. संशय येताच काही लोकांनी कारजवळ जाऊन पाहणी केली. कारमधील दृश्य पाहताच ते थक्क झाले. राहुल वाल्मिकी एका विवाहित महिलेसोबत कारमध्ये अर्धवट कपड्यात आणि आक्षेपार्ह स्थितीत आढळून आला.
गावकऱ्यांचा रोष, व्हिडिओ व्हायरल -
हे दृश्य पाहताच गावकऱ्यांचा राग अनावर झाला. त्यांनी राहुलला कारमधून बाहेर येण्यास भाग पाडले. त्यावेळी त्यांनी त्याचा व्हिडिओ शूट केला. ज्यामध्ये राहुल लोकांसमोर गुडघ्यांवर बसून माफी मागताना दिसत आहे. “मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा” अशी गयावया करताना दिसत आहे. संबंधित महिला आपला चेहरा ओढणीने झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे.
भाजपकडून निलंबनाची कारवाई -
या व्हिडिओमुळे प्रचंड खळबळ उडाल्यानंतर भाजपने तातडीची कारवाई करत राहुल वाल्मिकीला पक्षातून निलंबित केलं आहे. बुलंदशहर जिल्हाध्यक्ष विकास चौहान यांनी अधिकृत पत्र जाहीर करत ही कारवाई झाल्याची पुष्टी केली आहे. या आदेशानुसार, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पक्षपदांवरून निष्कासित करण्यात आले आहे.
पोलिस तपास सुरू, पण गुन्हा दाखल नाही -
या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून पोलिसांनी व्हिडिओचा तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही एफआयआर दाखल झालेली नाही. स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी यावर नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.